2 Thousand RS Note: २ हजारच्या नोटा बाजारातून गायब, संसदेत मोदी सरकारने दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी आणली. यानंतर २००० आणि पाचशेच्या नव्या नोटा बाजारात आल्या आहेत. परंतु मागील वर्षांपासून बाजारात २००० हजार रुपयांच्या नोटा गायब होत चालल्या आहेत. हल्ली चलनातही २००० हजार रुपयांच्या नोटा जास्त नसल्याचे आढळले आहे. यावरुन केंद्र सरकारने संसदेत माहिती दिली आहे. चलनातील २ हजार रुपयांच्या नोटा नक्की कुठे गेल्या याबाबत राज्यसभेत मोदी सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.

देशातील बाजारात नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात नोटांची संख्या घटली आहे. आताच्या घडीला बाजारात दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या २२३.३ कोटींवर आहे. एकूण नोटांच्या मुल्यापैकी हा आकडा १.७५ टक्के आहे. २०१८ मध्ये केंद्र सरकारने २ हजार रुपयांच्या एकूण ३३६.३ कोटी नोटा चलनात आणल्या होत्या परंतु आता या नोटा चलनात कमी प्रमाणात दिसत आहेत. यावर अर्थ मंत्रालयाचे राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत या नोटांबाबत लिखीत उत्तर दिलं आहे.

अर्थ मंत्रालयाचे राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी उत्तरात म्हटलं आहे की, एका मुल्याच्या नोटांची छपाई किती प्रमाणात करायची याचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानेच घेतला जातो. या नोटा जनतेच्या व्यवहाराच्या मागणीला सुविधाजनक करण्यासाठी उपलब्ध करण्याची जबाबदारी असते. नोटबंदीनंतर ३१ मार्च २०१८ पर्यंत बाजारात आणि चलनात २ हजार रुपयांच्या एकूण ३३६.४ कोटी नोटा होत्या. मात्र २०१८ नंतर या नोटा छपाई करण्यासाठी करन्सी प्रिंटिंग प्रेसमध्ये नवीन ऑर्डर दिली गेली नाही. २०१८-१९ पासून नवीन २००० रुपयाच्या नोटा छापण्यासाठी नवीन इंडेंट ठेवला गेला नाही यामुळे बाजारात नव्या नोटा उपलब्ध झाल्या नाहीत. तसेच बाजारात ज्या जुन्या २ हजार रुपयाच्या नोटा होत्या त्या गहाळ आणि खराब झाल्यावर त्यांना चलनातून बाद करण्यात आले. यामुळे सध्या बाजारात आणि चलनात २ हजार रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात नाहीत असे पंकज चौधरी यांनी सांगितले आहे.


हेही वाचा :  Pakistan Inflation: पेट्रोलपेक्षा दूध महाग, पाकिस्तानने महागाईत नेपाळ-भूटानलाही मागे टाकलं


 

First Published on: December 8, 2021 10:00 AM
Exit mobile version