मोदी सरकारचा कारभार केवळ आपल्या मित्रांसाठी, सोनिया गांधींचे जोरदार टीकास्त्र

मोदी सरकारचा कारभार केवळ आपल्या मित्रांसाठी, सोनिया गांधींचे जोरदार टीकास्त्र

रायपूर : छत्तीसगडमधील नवीन रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या 85व्या पूर्ण अधिवेशनात सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) सर्व स्वायत्त संस्थांवर कब्जा केला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी नव्हे तर त्यांच्या मित्रांसाठी राज्यकारभार चालवत आहेत, असा घणाघात सोनिया गांधी यांनी केला.

भाजपच्या राजवटीला खंबीरपणे सामोरे जाण्याची गरज आहे. आमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्याला जनसंपर्क वाढवावा लागेल, असे सांगून सोनिया गांधी म्हणाल्या, भाजपा विद्वेषाचे राजकारण करीत असून द्वेषाच्या आगीला हवा दिली जात आहे. अल्पसंख्य, महिला, दलित, आदिवासी यांना भाजपाकडून लक्ष्य केले जात आहे. भाजपाने प्रत्येक यंत्रणेवर कब्जा केल्याने पक्षासाठी आणि देशासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या अधिवेशनाचा आज, शनिवारी दुसरा दिवस आहे.

काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून एक माध्यम आहे, ज्याद्वारे लोक समानता, स्वातंत्र्य आणि न्यायासाठी संघर्ष करतात. काँग्रेसने नेहमीच लोकशाही मजबूत करण्याचे काम केले आहे. आपण लोकांचा आवाज पुढे नेतो आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करतो. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली चांगले सरकार आपण दिले होते. आता आपला मार्ग खडतर असला तरी, आपण नक्कीच जिंकू, असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.

सन 1998मध्ये मी पहिल्यांदा पक्षाध्यक्ष झाले तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजे गेल्या 25 वर्षांत चढ-उतार बघितले. अनेक चांगले तर, काही वाईट अनुभव आले. 2004 आणि 2009 मधील पक्षाची कामगिरी असो किंवा मनमोहन सिंग यांना पंतप्रधान करण्याचा माझा निर्णय असो, वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हे समाधानकारक होते. या सर्वांत मला कार्यकर्त्यांचे पूर्ण सहकार्य लाभले. मला सर्वात जास्त समाधान देणारी गोष्ट म्हणजे भारत जोडो यात्रेद्वारे माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. पक्षासाठी हा टर्निंग पॉइंट आहे, असे त्या म्हणाल्या.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे कौतुक
सोनिया गांधी यांनी खासदार राहुल गांधी यांचेही भरभरून कौतुक केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्राने चांगला परिणाम साधला गेला आहे. या यात्रेत राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या ऐकल्या, ते कौतुकास्पद असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या.

First Published on: February 25, 2023 2:56 PM
Exit mobile version