मोदींचा सामना राहुलशी, माझ्याशी नाही – प्रियांका गांधी

मोदींचा सामना राहुलशी, माझ्याशी नाही  – प्रियांका गांधी

प्रियांका गांधी (फाईल फोटो)

काँग्रेसच्या प्रियांका गांधी राजकारणात आल्यापासून आणि त्यांनी सरचिटणीस पदाचा पदभार स्विकारल्यापासून, राजकीय वर्तुळात संमीश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता प्रियांका यांनी पंतप्रधान मोदींवरुन नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. ‘पतंप्रधान नरेंद्र मोदींचा सामना माझ्याशी नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशी होणार आहे’, असं वक्तव्य प्रियांकानी माध्यमांशी बोलताना केलं. प्रियंका गांधी यांनी जयपूरहून दिल्लीत परतल्यानंतर विविध लोकसभा क्षेत्रातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांची ही बैठक सुमारे १६ तास सुरु होती. बैठकांनंतर बुधवारी पहाटे पाच वाजता माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ‘तुमची लढत मोदींशी आहे का?’ असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर उत्तर देताना प्रियांका म्हणाल्या की, ‘राहुल गांधी यांच्याशी मोदींना सामना करायचा आहे, माझ्याशी नाही.’

दरम्यान, पक्ष कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीविषयी बोलताना प्रियांका म्हणाल्या की ‘संघटनेत आणखी बऱ्याच बदलाची गरज आहे. मी सध्या बरंच काही शिकत आहे. मला लोकांंचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. निवडणुका कशा जिंकल्या जाव्यात यावर सध्या आमची चर्चा सुरु आहे.’

मी माझं काम सुरु ठेवणार

प्रियांका यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. याविषयी प्रियांकाना विचारलं असता त्या म्हणाल्या, ‘या गोष्टी एकीकडे सुरुच राहतील. मी मात्र माझं काम सुरुच ठेवणार. या गोष्टींमुळे मला फरक पडत नाही’, दिल्लीत ईडीच्या पथकाने रॉबर्ट वढेरा यांची तीन दिवस सलग चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी त्यांची जयपूरमध्ये चौकशी करण्यात आली. या चौकशीच्यावेळी प्रियांका त्यांच्यासोबत होत्या.

 

First Published on: February 13, 2019 2:02 PM
Exit mobile version