रोड शोमधून मोदींचे वाराणसीत शक्तिप्रदर्शन

रोड शोमधून मोदींचे वाराणसीत शक्तिप्रदर्शन

दोन तास शहरातील रस्ते मोदीमय

लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपला मतदारसंघ वाराणसीत मोठा रोड-शो केला. या रोड-शोदरम्यान मोदी यांनी शक्तीप्रदर्शन केले. रोड-शोची सुरुवात काशी हिंदू विद्यापीठातील भारतरत्न मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली. रोड-शोनंतर मोदींनी दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केली. शुक्रवारी मोदी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

भगव्या रंगाचा सदरा-पायजमा घातलेल्या पंतप्रधानांनी मालवीय यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शंखनाद करण्यात आला. त्यानंतर जमलेल्या लोकांचे अभिवादन स्वीकारत मोदी काळ्या रंगाच्या रेंज रोवर कारवर स्वार झाले. त्याबरोबर तब्बल १० किलोमीटर लांबीच्या मोदींच्या रोड-शोला सुरुवात झाली. मोदी…मोदी… आणि भारता माता की जय या अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेले होते. मोदींचा तांडा पुढे जाऊ लागला. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या वाराणसीकरांनी मोदींच्या नावाची घोषणा केली. पंतप्रधान मोदी हात हलवून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार करत होते.

ररोड-शोच्या दरम्यान अनेकांना मोदींशी हस्तांदोलन करायचे होते, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही त्यांच्या गाडीजवळ येऊ दिलेले नाही. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या बाल्कनीत मोदींना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या लोकांनी मोदींच्या अंगावर पुष्प वर्षाव केला. रोड-शोला झालेली गर्दी आणि वाराणसीकरांचे प्रेम पाहून मोदीही सद्गदित झाल्याचे दिसून आले. या रोड-शोला भाजपाध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अनेक भाजप नेते उपस्थित होते.

प्रियांका लढणार नाही
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वडेरा या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याविरोधात लढणार असल्याचे वृत्तवाहिन्यांकडून वारंवार सांगितले जात होते. मात्र गुरुवारी प्रियांका गांधी यांनी मीडियाचा हा कयास खोटा ठरवला. वारासणीतून काँग्रेसने अजय राय यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे वाराणसीतून प्रियांका निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट झाले आहे. आधी उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आणायची आणि त्यानंतर प्रियांका यांना २०२४ च्या लोकसभेच्या रणसंग्रामात उतरवायचे, अशी रणनीती काँग्रेसने आखल्यानेच प्रियांका यांना वाराणासीतून लढण्यास मनाई करण्यात करण्यात आली आहे.

First Published on: April 26, 2019 4:42 AM
Exit mobile version