‘लंडन प्लॅन’अंतर्गत माझ्या अटकेची कारवाई, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

‘लंडन प्लॅन’अंतर्गत माझ्या अटकेची कारवाई, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

लाहोर : तोशखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Ex PM Imran Khan) यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर गेल्या 14 तासांपासून अधिक काळ पोलीस आणि त्यांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी आज पहाटे सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून ही अटकेची कारवाई ‘लंडन प्लॅन’चा भाग असल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (PTI) अध्यक्ष इम्रान खान यांना लाहोरमध्ये अटक करण्यासाठी आलेल्या इस्लामाबाद पोलीस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. पीटीआय कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. या हिंसक चकमकीत इस्लामाबादच्या अनेक पोलीस कर्मचारी आणि पीटीआय कार्यकर्ते जखमी झाले.

इम्रान खान यांच्या व्हिडीओमुळे परिस्थिती चिघळली
एकीकडे इम्रान खान यांना अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस जमान पार्क (Zaman Park) येथील निवासस्थानी आले असतानाच इम्रान खान यांनी एक मिनिट 12 सेकंदाचा एक व्हिडीओ जारी केला. त्यामुळे त्यांचे समर्थक आणि पीटीआय कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले व परिस्थिती चिघळली. पोलीस मला अटक करण्यासाठी आले आहेत. मी नागरिकांसाठी संघर्ष करीत आहे. मला काही झाले तरी, हे युद्ध थांबणार नाही, असे सांगत इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना घरे सोडण्याचे आवाहन केले आहे. माझ्या अटकेनंतर देश स्वस्थ बसेल, असे सरकारला वाटते. पण ते चुकीचे आहे, हे दाखवून द्यावे लागेल. मला काही झाले आणि मला तुरुंगात पाठवले गेले किंवा मला मारले गेले, तर इम्रान खानशिवायही लढू शकता हे तुम्हाला दाखवून द्यावे लागेल, असे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.

पहाटे दुसरा व्हिडीओ केला जारी
इम्रान खान यांनी पहाटे पाचच्या सुमारास ट्विटरवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला. पोलिसांनी ज्या प्रकारे मला टार्गेट केले, असे पहिल्यांदाच घडले आहे. त्यांनी हे पाऊल का उचलले, याचे कारण मला समजलेले नाही. वास्तविक 18 तारखेला माझा जामीन असताना तो घेण्यासाठी मी का येत नाही, हे त्यांना माहीत होते. सुरक्षेच्या कारणास्तव मी तो घेतला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ते पुन्हा तयारी करत आहेत, याची मला माहिती आहे. मी लाहोर उच्च न्यायालयात 18 तारखेला न्यायालयात हजर राहीन, असे हमीपत्र दिले आहे. पण त्याचा स्वीकार त्यांनी केलेला नाही. कारण त्यांची वृत्तीच तशी नाही, असा दावा त्यांनी केला.

नवाझ शरीफ यांच्यावर शरसंधान
आपल्या समर्थकांना पांगविण्यासाठी लाठीमार करण्याबरोबरच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. हा ‘लंडन प्लॅन’ असल्याचे सांगत इम्रान खान म्हणाले, इम्रान खान यांना तुरुंगात टाकायचे, तेहरीक-ए-इन्साफला खाली खेचायचे आणि सर्व खटले संपवण्याची हमी नवाझ शरीफ यांना देण्यात आली आहे, असा हा प्लॅन लंडनमध्ये तयार झाला आहे. त्याचा कायद्याशी काहीही संबंध नाही आणि मी देखील कोणतही गुन्हा केलेला नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

First Published on: March 15, 2023 9:55 AM
Exit mobile version