चंद्रावरील ‘विक्रमला’ नासाची साद; पाठवला ‘हॅलो’चा संदेश

चंद्रावरील ‘विक्रमला’ नासाची साद; पाठवला ‘हॅलो’चा संदेश

चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असताना चांद्रयान २ चं लँडर विक्रशी इस्त्रोचा संपर्क तुटला. त्यामुळे भारताच्या या मोहिमेकडे डोळे लागलेल्या जगाचीही निराशा झाली. त्यानंतरही आशा न सोडता भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) विक्रमशी पुन्हा संपर्क साधण्याचे अखेरचे प्रयत्न करत आहे. भारताच्या या प्रयत्नांना आता अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासासुद्धा साथ देत आहे. यावेळी विक्रमशी संपर्क साधण्यासाठी नासाने विक्रम लँडरला ‘हॅलो’ मेसेज पाठवला आहे. दरम्यान ७ सप्टेंबर रोजी हार्ड लँडिंग झाल्याने विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर पडलं. त्यामुळे त्याचा इस्त्रोशीदेखील संपर्क तुटला.

नासाने पाठवला रेडिओ संदेश

चंद्रावर पडलेल्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी नासाने आपल्या आपल्या डीप स्पेस नेटवर्क (DSN)च्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधून विक्रमला एक रेडिओ संदेश पाठवला आहे. इस्त्रोच्या परवानगीनेच ‘विक्रम’शी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचे एका वृत्तपत्राला नासाच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा – हा तर फक्त ट्रेलर – पंतप्रधान नरेंद्र मोदी

१४ दिवसांत संपर्क होणे आवश्यक

विक्रम लँडर चंद्रावर पडून सहा दिवस उलटले आहेत. पण अद्याप त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. इस्रोने दिलेल्या प्री-लाँच अनुमानानुसार, विक्रमला केवळ एक चांद्र दिवसासाठी (म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस) सूर्याचा थेट प्रकाश मिळणार आहे. म्हणजेच पृथ्वीवरील केवळ १४ दिवसांसाठीच विक्रमला सूर्याचा प्रकाश मिळणार आहे. त्यामुळे हे १४ दिवस इस्त्रो ‘विक्रम’ लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. कारण त्यानंत पुढील १४ दिवस चंद्रावर एक मोठी काळी रात्र असेल. विक्रमचे यशस्वी लँडिंग झाले असते तरी तो केवळ १४ दिवसच चंद्रावर काम करु शकणार होता. त्यामुळे येत्या २० ते २१ सप्टेंबरपर्यंत विक्रमशी संपर्क न झाल्यास तर संपर्काच्या सर्व आशा मावळतील.

First Published on: September 12, 2019 5:19 PM
Exit mobile version