पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून महिलांना धोका, त्यांना पदावरून हटवा- राष्ट्रीय महिला आयोगाचे सोनियांना साकडे

पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पदभार स्वीकारताच नवीन वादाला सुरूवात झाली आहे. चन्नी यांच्याविरोधात महिलेची छेड काढल्याचे जुनेच प्रकरण नव्याने चर्चेत आले असून राष्ट्रीय महिला आयोगाने चन्नी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. चन्नी यांच्यापासून महिलांना धोका असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे.

याप्रकरणी बोलताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या कि २०१८ साली मी टू चळवळीदरम्यान चन्नी यांच्यावर महिलेची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्याची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने चन्नी यांच्याविरोधात मोर्चे, आंदोलन केली होती. पण त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. आज पुन्हा एकदा ज्या पक्षाचे नेतृत्व एक महिला करते त्या पक्षाने चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवले आहे. हा आमचा विश्वासघात असून मुख्यमंत्री पदासाठी चन्नी लायक नसल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच आपण स्वत सोनिया गांधी यांना चन्नी यांना पदावरून हटवण्याची विनंती करत आहोत असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

 

रविवारी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चन्नी यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर लगेचच भाजप नेते अमित मालवीय यांनी चन्नी यांच्याशी संबंधित मी टू प्रकरणाचा हवाला देत राहुल गांधी यांना लक्ष्य केलं होतं. यावेळी २०१८ साली एका आयएएस महिला अधिकाऱ्याला चन्नी आक्षेपार्ह मेसेज पाठवत असल्याच्या प्रकरणाची मालविय यांनी आठवण करून दिली होती.

First Published on: September 20, 2021 8:23 PM
Exit mobile version