chhattisgarh naxal attack-नक्षलवाद्यांच्या ताब्यात एक जवान, मदत करा, कुटुंबीयांचे मोदी, शहांना साकडे

छत्तीसगड मधील बीजापूर आणि सुकूमा या जंगलपरिसरात शनिवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २३ जवान शहीद झाले. तर २५ हून अधिक जवान जखमी झाले आहेत. पण चकमकीनंतर राकेश्वर सिंह (३५) हा जवान बेपत्ता होता. त्याला नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दरम्यान, राकेश्वरची नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटका करा अशी विनंती त्याच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे.

शनिवारी झालेल्या या चकमकीनंतर २४ जवान बेपत्ता होते. रविवारी सकाळी यातील २३ जणांचे मृतदेह जंगलाच्या विविध भागात सापडले. नक्षलवाद्यांनी रॉकेट लॉंचर व अत्याधुनिक शस्त्रांनी जवानांवर हल्ला केला होता. पण चकमकीनंतर राकेश्वर सिंह हा जवान बेपत्ता होता. सुरक्षा रक्षक त्याचा शोध घेत होते. पण त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. याचदरम्यान,येथील एका स्थानिक पत्रकाराला एक जवान आमच्या ताब्यात असल्याचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपण हिडमा बोलत असल्याचे सांगितले. दरम्यान, नक्षलवाद्यांकडून यासंबंधी सुरक्षा यंत्रणेला कुठलाही फोन आलेला नाही. पण जर खरचं राकेश्वर सिंह नक्षलवाद्यांच्या ताब्यात असेल तर परिस्थिती अधिक कठीण होईल असे सांगण्यात येत आहे.

तर राकेश्वर जिवंत असून नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचे कळाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मोदी व शहा यांच्याकडे त्याची सुखरुप सुटका करण्याची विनंती केली आहे.

First Published on: April 5, 2021 7:54 PM
Exit mobile version