बंद चीन सुरू झालं आणि पुन्हा उसळला कोरोना; एका दिवसात ६३ नवे रुग्ण!

बंद चीन सुरू झालं आणि पुन्हा उसळला कोरोना; एका दिवसात ६३ नवे रुग्ण!

प्रातिनिधिक छायाचित्र

चीनमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला असून चीनने वुहान शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार सुरु केले, त्याला १ दिवस होत नाही तोच चीनमध्ये एक दिवसात तब्बल ६३ नवीन रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) दिलेल्या माहितीनुसार या नवीन रुग्णांमध्ये देशांतर्गत रूग्ण २ आणि इतर देशांमधून प्रवास करून आलेले ६१ जण आहेत. नवीन रुग्णांसह चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की बुधवारी चीनमध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर हा लॉकडाउन उठविण्यात आला, परंतु नवीन प्रकरणांमुळे देशामध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन उठवण्याचा पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

चीनमध्ये कोरोनामुळे नव्याने झालेल्या दोन मृत्यूंसह एकूण मृत्यूची संख्या ३,३३५ वर गेली आहे. त्याच वेळी, एकूण कोरोना विषाणूची लागण झालेली प्रकरणे ८१,८६५ वर पोचली आहेत. अलीकडेच, चीनमध्ये नवीन रुग्ण आढळणं थांबलं होतं. सलग तीन दिवस देशांतर्गत कोणताही रुग्ण आढळला नाही. पण आता पुन्हा एकदा नवीन प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. अगदी एका दिवसापूर्वीच चीनने वुहान प्रांतातून ७६ दिवसांनंतर लॉकडाऊन उठवून कामकाज पुन्हा सुरू केलं होतं.

कोरोनावर लस शोधण्याच्या संशोधनात चीन अव्वल!

कोरोनावर लस शोधण्यासाठी जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. यातही चीन पुढे आहे. चीनने आतापर्यंत सर्वाधिक ६० संशोधन आणि प्रयोग केले आहेत. जगभरातील ३९ देशांमध्ये हे संशोधन सुरु असून आतापर्यंत ३०० प्रयोग करण्यात आले आहेत. त्यात चीनचे प्रयोग जास्त आहे. अमेरिकेत ४९ प्रयोग केले आहेत. या यादीत अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.

First Published on: April 9, 2020 4:57 PM
Exit mobile version