केजरीवालांना चापट मारणारा ‘आप’चाच समर्थक? व्हिडिओमुळे खळबळ

केजरीवालांना चापट मारणारा ‘आप’चाच समर्थक? व्हिडिओमुळे खळबळ

तरुणाने अरविंद केजरीवालांच्या कानाखाली मारली

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रॅली दरम्यान चापट मारणाऱ्या युवकाच्या ओळखीबददल नवी माहिती प्रकाशात आल्याचा दावा करण्यात येत आहे. चापट मारणाऱ्या सुरेश चौहान चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रसारित झाला आहे. त्या व्हिडिओत तो आम आदमी पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचे दिसत आहे. त्यावरून लक्षात येते की तो यापूर्वीही आम आदमी पक्षाच्या कार्यक्रमाला जात आला आहे. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.


चापट मारल्याच्या घटनेनंतर संबंधित युवकाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी भक्त संबोधले होते, मात्र पोलिसांनी तो आम आदमी पक्षाचाच कथित कार्यकर्ता असल्याचे सांगितले होते. आपल्यावर वारंवार होणाऱ्या हल्ल्याबद्दल काळजी व्यक्त करत या मागे मोठे षडयंत्र असल्याची शंका व्यक्त केली होती. तसेच यासाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरले होते. मात्र दिल्ली पोलिसांनी संबंधित चौहान याला आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितल्यावर, पोलिस खोटे बोलत असल्याचा दावा आप ने केला होता. दिल्ली पोलिसांचे म्हणणे होते की प्राथमिक चौकशीत सरेश चौहान हा एक भंगार व्यावसायिक असून तो आम आदमी पक्षाचा समर्थक आहे. इतकेच नव्हे, तर आपच्या सभांचे आयोजनातही त्याचा सहभाग असतो असा दावाही पोलिसांनी केला होता.

या घटनेचे उपायुक्त स्तरावरील चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले असले, तरी या प्रकरणी प्राथमिक तक्रारीची नोंद नसल्याचेही त्यांनी सांगितले. चापट मारणारा पक्षाच्या नेत्यांच्या वागणूकीवर नाराज होता, तसेच पक्षाने सैनिकांवर अविश्वास दाखवल्यामुळे तो वैतागलेला होता असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

First Published on: May 7, 2019 3:35 PM
Exit mobile version