भाजप नेत्यांनी तोंड बंद ठेवण्याची गरज – नितीन गडकरी

भाजप नेत्यांनी तोंड बंद ठेवण्याची गरज – नितीन गडकरी

एकीकडे भाजपाचे काही नेते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वादात सापडत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अशा भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत. ‘काही भाजप नेत्यांनी स्वतं:चं तोंड बंद ठेवण्याची गरज आहे’, अशा कानपिचक्या नितीन गडकरींनी या नेत्यांना दिल्या असल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या एका खासगी कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे भाजपच्या वाचाळवीर नेत्यांना चाप बसणार असल्याचं बोललं जात आहे.

हनुमानाची जात आणि राहुल गांधींचं गोत्र!

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी ‘हनुमान हा दलित होता’, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार राय यांनी ‘हनुमार दलित नसून आदिवासी होता’, अशा स्वरूपाचं विधान केलं होतं. तर दुसरीकडे राहुल गांधींनी मंदिरात जाऊन केलेल्या पूजेच्या पार्श्वभूमीवर काही भाजप नेत्यांनी राहुल गांधींचं गोत्र काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – मी तसं म्हणालोच नव्हतो – नितीन गडकरी

‘बोलघेवड्या नेत्यांना दुसरं काम द्यायला हवं’

‘भाजप नेत्यांनी कमी बोलण्याची गरज आहे. मीडियाला सामोरं जाताना भाजप नेत्यांनी कमी बोलायला हवं. आमच्याकडे भरपूर नेते आहेत. आणि त्यातल्या काहींना पत्रकारांशी बोलायला फार आवडतं. त्यामुळे अशा उत्साही नेत्यांना दुसरं काहीतरी काम देण्याची गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया यावेळी नितीन गडकरींनी दिली.

सर्वोच्च न्यायालयापेक्षा जेपीसी मोठी आहे का?

दरम्यान, राफेल प्रकरणानंतर भाजपने देशभरात घेतलेल्या ७० पत्रकार परिषदांवर देखील यावेळी नितीन गडकरींनी भूमिका स्पष्ट केली. ‘काँग्रेसने राफेल प्रकरणाच्या चौकशीसाठी संसदीय समितीची मागणी केली आहे. पण संसदीय समिती सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठी आहे का?’ असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.


पाहा व्हिडिओ – नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये?
First Published on: December 20, 2018 11:27 AM
Exit mobile version