कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, बीबीसी छापेमारीबाबत केंद्र सरकारची भूमिका

कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, बीबीसी छापेमारीबाबत केंद्र सरकारची भूमिका

मुंबई : कथित करचुकवेगिरीच्या तपासाअंतर्गत प्राप्तिकर विभागाने मंगळवारी दिल्ली आणि मुंबईतील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी) कार्यालयात ‘सर्व्हे ऑपरेशन’ केले. 2002च्या गुजरात दंगलीसंदर्भात बीबीसीने बनविलेल्या माहितीपटाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला. मात्र केंद्र सरकारने विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावताना कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, असे म्हटले आहे.

आयकर विभागाचे अधिकारी मंगळवारी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) दिल्लीतील कार्यालयात आंतरराष्ट्रीय करआकारणीसंदर्भातील कथित अनियमिततेचे सर्वेक्षण करण्यासाठी दाखल झाले. बीबीसीच्या मुंबई कार्यालयातही असे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, प्राप्तिकर विभागाने त्या सर्वेक्षणाचा तपशील शेअर केला नाही. यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांना कल्याण येथे विचारणा केली असता, कोणीही देशाच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. बीबीसीच्या नवी दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा तपशील प्राप्तिकर विभाग शेअर करेल, असे ते म्हणाले.

जिथे जिथे आढळते, तिथे प्राप्तिकर विभाग वेळोवेळी सर्वेक्षण करतो. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर, प्राप्तिकर विभाग एक प्रेस नोट जारी करते किंवा यासंदर्भातील माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करते. मला खात्री आहे की, जेव्हा प्राप्तिकर विभाग त्याचे सर्वेक्षण पूर्ण करेल, तेव्हा ते तपशील तुमच्याशी शेअर करेल, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

विरोधकांची टीका
बीबीसीच्या कार्यालयावरील आयटी छापे उद्वेगजनक असून मोदी सरकार टीकेला घाबरत असल्याचे त्यातून दिसत आहे. या दडपशाहीच्या प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. ही लोकशाहीविरोधी हुकूमशाही वृत्ती यापुढी चालू शकत नाही, असे ट्वीट काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी केले आहे.

बीबीसीवरील छापेमारी म्हणजे ‘वैचारिक आणीबाणी’ असल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी, सेबीच्या चेअरमनना भेटायला गेलेल्या अदानी यांना ‘फरसाण सेवा’ देण्यात आली, अशी उपरोधिक टीका केली आहे.

बीबीसी कार्यालयावर छापेमारीचे कारण आणि परिणाम तर स्पष्ट आहेत. सत्य बोलणाऱ्यांना निर्लज्जपणे केंद्र सरकार त्रास देत आहे. विरोधी पक्षनेते असो, प्रसारमाध्यमे असो, कार्यकर्ते असो की अन्य कोणीही असो… सत्यासाठी लढण्याची किंमत मोजावीच लागते, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

First Published on: February 14, 2023 10:11 PM
Exit mobile version