माझा किंवा माझ्या कुटुंबीयांचा राजकीय पक्षाशी संबंध नाही; भारत बायोटेकच्या एमडींचे स्पष्टीकरण  

माझा किंवा माझ्या कुटुंबीयांचा राजकीय पक्षाशी संबंध नाही; भारत बायोटेकच्या एमडींचे स्पष्टीकरण  

भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला

भारतात सीरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड, तसेच भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोवॅक्सिन या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने रविवारी संमती दिली होती. त्यानंतर या लसीवरून राजकारण सुरु झाल्याचे पाहायला मिळाले होते. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने या दोन्ही लसींबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आरोग्य मंत्रालयाने कोवॅक्सिनच्या वापराला संमती देण्याची घाई केली असून या लसीचा वापर धोकादायक ठरू शकतो, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेशशी थरूर म्हणाले होते. थरूर यांच्याप्रमाणेच काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनीही काही शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, कोवॅक्सिन लसीवर शंका घेण्याचे कारण नसल्याचे भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी स्पष्ट केले.

कोवॅक्सिन लसीची चाचणी केवळ भारतात झालेली नाही. आम्ही पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश यांच्यासह १२ हून अधिक देशांमध्ये या लसीची चाचणी करत आहोत. आमची कंपनी भारतापुरती मर्यादित नसून जगभरात आम्ही काम करतो. आमच्याबद्दल ७० हून अधिक लेख आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये छापून आले आहेत. त्यामुळे आमचा डेटा पारदर्शी नसल्याचे म्हणणे योग्य नाही, असेही कृष्णा एला यांनी नमूद केले.

First Published on: January 4, 2021 10:11 PM
Exit mobile version