दिल्ली बॉम्बस्फोट : ‘हा तर फक्त ट्रेलर’; चिठ्ठीमुळे खळबळ

दिल्ली बॉम्बस्फोट : ‘हा तर फक्त ट्रेलर’; चिठ्ठीमुळे खळबळ

'हा तर फक्त ट्रेलर'; चिठ्ठीमुळे खळबळ

अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायली दूतावासाच्या इमारतीपासून काही मीटर अंतरावर शुक्रवारी सायंकाळी ५.०५ मिनिटांनी स्फोट झाला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या काचा फुटल्याचे समोर आले आहे. एकीकडे दिल्लीत शेतकर्‍यांच्या हिंसक आंदोलनामुळे अगोदरच तेथे तणाव असताना या स्फोटामुळे दिल्ली पुन्हा हादरली आहे. त्यातच आता त्याठिकाणी पोलिसांना एक लिफाफा आढळून आला असून त्यात एक चिठ्ठी आढळली आहे. त्या चिठ्ठीत एक मजकूर लिहिण्यात आला असून त्या मजकूरामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर’ आहे, असा इशारा देण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली कॅब

इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून या परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यामध्ये कॅब दिसत असून या कॅबमध्ये दोन लोकांना घटनास्थळी सोडले आणि नंतर त्याठिकाहून कॅब निघून गेल्याचे दिसत आहे. सीसीटीव्हीत ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून दोन्ही व्यक्तींचे स्केच तयार केले आहेत.

कुठे झाला स्फोट?

हा स्फोट अब्दुल कलाम मार्गावर असलेल्या जिंदाल हाऊसबाहेर झाला. हे जिंदाल हाऊस इस्रायल दूतावासापासून काही मीटर अंतरावर आहे. स्फोटानंतर काही वेळातच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. या स्फोटात काळ्या पावडरचा वापर करण्यात आला होता, असे फॉरेन्सिक टीमकडून सांगण्यात आले. ही स्फोटके रस्त्याच्या कडेला लपवण्यात आली होती, असे ट्विट प्रसार भारती या वृत्तसंस्थेने केले होते.

या स्फोटानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना या घटनेची माहिती देण्यात आली. दिल्लीतील सर्व विमानतळे, महत्त्वाची आस्थापने, सरकारी इमारतींचे संरक्षण करणार्‍या सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या स्फोटाबद्दल अहवाल मागितला असून दिल्ली पोलीस आयुक्तांनी गृहमंत्रालयाच्या उच्चाधिकार्‍यांना या घटनेबद्दल माहिती दिली आहे.


हेही वाचा – दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट


 

First Published on: January 30, 2021 12:32 PM
Exit mobile version