दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट

कोणीही जखमी नाही

israeli embassy in india delhi IED blast near Israeli embassy in Delhi,

अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायली दूतावासाच्या इमारतीपासून काही मीटर अंतरावर शुक्रवारी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी स्फोट झाला. या स्फोटामुळे कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या काचा फुटल्या. दिल्लीत झालेल्या शेतकर्‍यांच्या हिंसक आंदोलनामुळे अगोदरच तेथे तणाव असताना या स्फोटामुळे दिल्ली पुन्हा हादरली.

हा स्फोट अब्दुल कलाम मार्गावर असलेल्या जिंदाल हाऊसबाहेर झाला. हे जिंदाल हाऊस इस्रायल दूतावासापासून काही मीटर अंतरावर आहे. स्फोटानंतर काही वेळातच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. या स्फोटात काळ्या पावडरचा वापर करण्यात आला होता, असे फॉरेन्सिक टीमकडून सांगण्यात आले. ही स्फोटके रस्त्याच्या कडेला लपवण्यात आली होती, असे ट्विट प्रसार भारती या वृत्तसंस्थेने केले आहे.

कमी क्षमतेच्या स्वयंचलित स्फोटकांचा स्फोट ५, अब्दुल कलाम मार्गावरील जिंदाल हाऊसजवळ संध्याकाळी ५.०५ वाजता झाला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. तसेच मालमत्तेचीही नुकसान झाले नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या काचा फुटल्या. प्राथमिक चौकशीत तणाव निर्माण करण्यासाठी कोणीतरी हे दुष्कृत्य केले असल्याचे आढळून येते, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले.

या स्फोटानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना या घटनेची माहिती देण्यात आली. दिल्लीतील सर्व विमानतळे, महत्त्वाची आस्थापने, सरकारी इमारतींचे संरक्षण करणार्‍या सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या स्फोटाबद्दल अहवाल मागितला असून दिल्ली पोलीस आयुक्तांनी गृहमंत्रालयाच्या उच्चाधिकार्‍यांना या घटनेबद्दल माहिती दिली आहे.