Odisha Train Accident : ‘या’ कारणामुळे ओडिशात घडला रेल्वे अपघात; चौकशीतून कारण आले समोर

Odisha Train Accident : ‘या’ कारणामुळे ओडिशात घडला रेल्वे अपघात; चौकशीतून कारण आले समोर

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या शनिवारी २८८ झाली, तर जखमींचा आकडा ९००वर जाऊन पोहचला आहे. आतापर्यंतच्या भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जात असून ओडिशातील या मृत्यूतांडवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षांमधील नेत्यांपासून ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे. पण या अपघाताबाबत एक महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. सिग्नल बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे आता सांगण्यात येत आहे. या घटनेची अधिक चौकशी करण्यात येत आहे. पण प्राथमिक चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.

प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, ओडिशात शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेतील कोरोमंडल एक्स्प्रेस आपला नियोजित ट्रॅक बदलून पर्यायी मार्गिकेमध्ये (लूप लाइन) गेली आणि त्यानंतर बहानगर बाजार स्थानकाच्या पुढे मुख्य मार्गाऐवजी तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला जाऊन धडकली. यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे बाजूच्या मार्गिकेवर कोसळले. याचवेळी दुसऱ्या मार्गिकेवरून जाणाऱ्या बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाडी कोरोमंडल एक्सप्रेसच्या बोग्यांना धडकले, असे रेल्वे मंडळाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेसला मेन लाइनसाठी आधी हिरवा दाखवण्यात आला. त्यानंतर काही क्षणांतच पुन्हा या ट्रेनला लाल सिग्नल देण्यात आला. पण त्याचवेळी ही एक्स्प्रेस मालगाडी उभ्या असलेल्या पर्यायी मार्गिकेवर वेगात पोहोचली व अपघात घडला, त्यामुळे सिग्नलच्या बिघाडामुळे हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर घटनास्थळी जाऊन भेटी देण्याचे सत्र राजकीय नेत्यांकडून सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अन्य राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांकडून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांमधील नेत्यांनी याप्रकरणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, या अपघातात जखमी आणि मृत्यू पावलेल्या प्रवाशांसाठी शुक्रवारी रात्रीच मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघाताची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. कमिशनर रेल्वे कमिटीलाही बोलावण्यात आले आहे. तेही चौकशी करतील. हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली जाईल. आता सर्व फोकस बचाव करण्यावर आहे. या अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना चांगल्या रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार केले जातील आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत त्या रुग्णांची माहिती पोहचवली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जो दोषी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल. त्याला सोडले जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: June 4, 2023 10:09 AM
Exit mobile version