एअर इंडियातील घृणास्पद प्रकार : आरोपीला पकडण्यासाठी दिल्ली पोलीस मुंबईत दाखल

एअर इंडियातील घृणास्पद प्रकार : आरोपीला पकडण्यासाठी दिल्ली पोलीस मुंबईत दाखल

संग्रहित

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या (Air India) विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने 70 वर्षीय महिलेवर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून संबंधित आरोपी मुंबईतील व्यावसायिक आहे. त्याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले, पण तो सापडला नाही. शिवाय, राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याप्रकरणाची दखल घेतली आहे.

विमान कंपनीने 28 डिसेंबर रोजी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील अधिक तपशील मिळविण्यासाठी पीडितेशी संपर्क साधला. जेव्हा एअर इंडियाने महिलेकडून मिळालेली सविस्तर तक्रार पोलिसांकडे सोपविली, तेव्हा आरोपीविरुद्ध 4 जानेवारी 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शेखर मिश्रा असे आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येते. त्याचे वय 45 ते 50च्या दरम्यान आहे. 26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये कपडे काढून सहप्रवाशावर लघवी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एका महिलेचा विनयभंग करणे, दारूच्या नशेत गैरवर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणे तसेच विमान नियमांबरोबरच भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या घरी दिल्लीचे पोलीस पथक पोहचले तेव्हा तो घरात नव्हता. आरोपी सापडला नाही तर, त्याच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर (Look out circular – LOC) जारी केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. यादरम्यान पोलिसांनी त्या विमानातील कर्मचाऱ्यांना देखील चौकशीसाठी पाचारण केले असून त्यांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे.

महिला आयोगाकडून दखल
गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाचे विमान क्रमांक 102 जॉन एफ. केनेडी विमानतळावरून दिल्लीला येत असताना ही घटना घडली. या घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करून यासंबंधीचा अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश महिला आयोगाने एअर इंडियाच्या चेअरमनना दिले आहेत.

आरोपीवर 30 दिवसांची प्रवासबंदी
आम्ही एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांकडून काही त्रूटी राहिली का, याची चौकशी करण्यासाठी आणि तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यात विलंब कशामुळे झाला याचा तपास करण्यासाठी एक अंतर्गत समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. तसेच, एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यास संबंधित प्रवाशाला 30 दिवसांची किंवा अंतर्गत समितीचा निर्णय होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण चौकशीत संबंधित प्रवासी दोषी आढळल्यास, नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई केली जाईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे.

First Published on: January 5, 2023 1:35 PM
Exit mobile version