ओमिक्रॉनच्या दहशतीत भारतीयांसाठी दिलासादायक बातमी

ओमिक्रॉनच्या दहशतीत भारतीयांसाठी दिलासादायक बातमी

जगभरात दक्षिण आफ्रिका, हाँगकाँगमधील कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत पाहायला मिळतेय. जगातील ७० देशांहून अधिक देशांमध्ये हा व्हेरिएंट आतापर्यंत वेगाने पसरला आहे. त्यामुळे डेल्टा व्हेरिएंटपेक्षा हा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जातेय. भारतात ओमिक्रॉनचे जवळपास १६८ रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ओमिक्रॉन व्हेरिएंटला जबाबदार धरले जाऊ शकते. एकीकडे ओमिक्रॉनने जगाची चिंता वाढवली असतानाच भारतीयांसाठी एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. एका रिसर्चनुसार, ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर शरीरातील अँटीबॉडी डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

जगभरातील अनेक शास्त्रज्ञ आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचे म्यूटेशन डिकोड करण्याबरोबर त्याविरोधात इम्यूनिटी विकसित करण्यासाठी रिसर्च करत आहेत. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एका संशोधनानुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटविरोधात इम्यूनिटी सिस्टम अधिक मजबूत करत आहे. त्यामुळे भारतासाठी ही एक दिलासाजनक गोष्ट आहे.

या रिसर्चमध्ये सांगण्यात आलेय की, ओमिक्रॉनबाधित झालेल्या आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात इम्यूनिटी पावर वाढतेय. या रिसर्चमध्ये दक्षिण आफ्रिकन ओमिक्रॉन व्हेरिएंटबाधित ३३ लोकांचा सहभाग घेतला होता. (लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या लोकांचा सहभाग)

यात शास्त्रज्ञांना आढळून आले की, १४ दिवसांत ओमिक्रॉनचे न्यूट्रलाइजेशन १४ टक्क्यांना वाढले मात्र डेल्टा व्हेरिएंटचे न्यूट्रलाइजेशन केवळ ४.४ टक्केच वाढले. लसीचे दोन्ही डोस घेऊनही ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना पुन्हा डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण होण्याचा धोका कमी होतोय. तसेच ओमिक्रॉन संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांनाही डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गाचा धोका कमी होतोय.

दक्षिण आफ्रिकेच्या हेल्थ रिसर्च इंस्टिट्यूटचे प्रोफेसर एलेक्स सिगल यांनी सोमवारी ट्वीट केले की, दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन संसर्गाचे प्रमाण फार कमी आहे. यामुळे डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग कमी करण्यासाठी मदत होतेय. त्यामुळे डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनबाधित रुग्णांना रुग्णालयात भरती करणे किंवा गंभीर आजारांची लक्षणांचा सामना करण्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले.

 


ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला मुलाला जन्म


First Published on: December 29, 2021 5:05 PM
Exit mobile version