Omicron Variant : देशात ओमिक्रॉनबाधितांचा आकडा ५०० पार, १९ राज्यांत आढळले इतके रुग्ण

Omicron Variant : देशात ओमिक्रॉनबाधितांचा आकडा ५०० पार, १९ राज्यांत आढळले इतके रुग्ण

देशात ओमिक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढत आहे. यात रविवारी महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात रविवारी एक दिवसात ओमिक्रॉनचे तब्बल ३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर केरळमध्ये १९, तेलंगणा ३, आंध्र प्रदेश २, हिमाचल प्रदेश १, ओडिशा ४, चंदीगड २ आणि मध्य प्रदेशमध्ये ९ रुग्ण आढळून आलेत. यामुळे देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या ५०१ वर पोहचली आहे. यात महाराष्ट्र, दिल्लीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. जाणून घ्या कोणत्या राज्यात आतापर्यंत किती रुग्ण आढळले आहेत.

कोणत्या राज्यात ओमिक्रॉनची किती प्रकरणे आहेत?

राज्य                            एकूण प्रकरणे               बरे झालेले रुग्ण

महाराष्ट्र –                        १४१                            ४२

दिल्ली –                         ७९                            २३

केरळ-                           ५७                             १

तेलंगणा-                         ४४                             १०

गुजरात –                         ४३                            १०

तामिळनाडू-                     ३४                              ०

कर्नाटक –                       ३१                             १५

राजस्थान –                      २२                              १९

हरियाणा –                      १०                               २

अशाचप्रकारे मध्यप्रदेश, ओडिशा, बंगाल, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, चंदीगड, उत्तरप्रदेश, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी ६ ते १ अशाप्रकारे रुग्ण आढळून आले आहेत.

देशात देण्यात आले १४१.७० लसींचे डोस 

कोव्हिन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत अँटी कोरोना लसीचे १४१.७० कोटी डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ८३.७९ कोटी लोकांना पहिला डोस तर ५८.९१ लोकांना दुसरा डोस देण्यात आलाय. गेल्या २४ तासांत देशात २८.११ लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत.

केंद्राने ‘या’ राज्यांत पाठवल्या मेडिकल टीम

ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने केरळ, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बंगाल, मिझोराम, कर्नाटक, झारखंड आणि पंजाब या १० राज्यांमध्ये केंद्रीय मेडिकल टीम तैनात केल्या आहेत. या टीम राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ट्रेसिंग-ट्रॅकिंगच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष देतील. तसेच कोरोना परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत संबंधित राज्याला उपाययोजना सुचवतील. याचा अहवाल मेडिकल टीमला केंद्राकडे सादर करावा लागेल. तसेच कोरोनाच्या योग्य पद्धती, आरोग्य सुविधा आणि लसीकरणाच्या प्रगतीवरही लक्ष केंद्रित करावे लागेल.

पंतप्रधान मोदींनी केले ‘हे’ आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले की, ओमिक्रॉनविरुद्धच्या लढाईत जागरूकता आणि शिस्त ही सर्वात मोठी ताकद आहे. आमचे शास्त्रज्ञ ओमिक्रॉनचा अभ्यास करत आहेत. त्यांना रोज नवनवीन आकडे मिळत आहेत. शास्त्रज्ञांच्या सूचनांनुसार पावले उचलली जात आहेत. पंतप्रधान म्हणाले की, सध्या आपली सामूहिक शक्तीच कोरोनाला हरवू शकेल. या जबाबदारीच्या भावनेने २०२२ या नवीन वर्षात प्रवेश करायचा आहे.


केंद्रीय निवडणूक आयोग आणि आरोग्य मंत्रालयाची आज बैठक, देशातील विधानसभा निवडणुकांचा निर्णय अपेक्षित

First Published on: December 27, 2021 8:40 AM
Exit mobile version