मोदी सरकारच्या निर्णयाचा पाकिस्तानला फायदा; पवारांनी व्यक्त केली चिंता

मोदी सरकारच्या निर्णयाचा पाकिस्तानला फायदा; पवारांनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

कांद्याची अचानक निर्यात बंदी केल्यानंतर देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी भेट घेऊन कांदा निर्यात मागे घेण्याबाबत चर्चा केली. याची माहिती पवार यांनी ट्विटरवर दिली. भारत हा जगभरात कांद्याचा खात्रीशीर निर्यातदार म्हणून ओळखला जातो. मात्र निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे भारताच्या प्रतिमेला धक्का बसणार आहे, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली. तसेच मोदी सरकारच्या या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली.

“केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली व विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली. आज सकाळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल (@PiyushGoyal) यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती विशद केली. बैठकीत प्रामुख्याने मुद्दा मांडला की कांदा उत्पादक जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे.”

“निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो. या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो.”

 

First Published on: September 15, 2020 1:51 PM
Exit mobile version