कुंभमेळ्यासाठी हवेत शाकाहारी आणि निर्व्यसनी पोलीस

कुंभमेळ्यासाठी हवेत शाकाहारी आणि निर्व्यसनी पोलीस

कुंभ मेळा (सौजन्य -अंग्वाल न्यूज )

एखाद्या मेट्रोमोनियल साईटवर तरुण-तरुणीच्या प्रोफाईलवर विविध मागण्या आपल्याला पहायला मिळतात. असा मुलगा हवा, तसा मुलगा हवा, अशी मुलगी हवी, तशी मुलगी हवी. अशाच मागण्या आता कुंभ मेळ्याच्या आयोजकांनी केल्या आहेत. त्या मागण्या पाहुन ‘ऐकावं ते नवलंच’ अशी प्रतिक्रिया लोकांमधून उमटतेय. कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी आम्हाला तरुण, निर्व्यसनी, मृदूभाषी आणि शाकाहारी पोलीस अधिकारी व कर्मचारी हवेत. याबाबत टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने वृत्त प्रकाशित केले आहे. पुढच्या वर्षी १५ जानेवारीला उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या सुरक्षेची जबाबदारी आता स्वच्छ चारित्र्य असलेल्या पोलिसांवर सोपवली जाणार आहे.

उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद येथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्याच्या सुरक्षेसाठी अलाहाबादबाहेरील पोलिसांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी तब्बल १० हजार पोलीस तैनात असणार आहेत. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ऑक्टोबरपासूनच कुंभ मेळ्याच्या तयारीला सुरूवात करणार आहेत. वयाची ३५ वर्षे उलटलेले पोलीस कर्मचारी कुंभ मेळ्याच्या बंदोबस्तासाठी नको, असे आयोजकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे बंदोबस्ताची प्रमुख जबाबदारी असणाऱ्या डीआयजी के. पी. सिंह यांनी बरेली, बदायू, शाहजहानपूर आणि पिलीभीतमधील पोलीस ठाण्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. सिंह यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्रदेखील मागवले आहे. चारित्र्य प्रमाणपत्र नसलेल्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कुंभमेळ्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी नसेल.

First Published on: September 28, 2018 6:08 PM
Exit mobile version