बीबीसीवरील प्राप्तिकराच्या छापेमारीवरून विरोधक आक्रमक, मोदी सरकारवर जोरदार टीका

बीबीसीवरील प्राप्तिकराच्या छापेमारीवरून विरोधक आक्रमक, मोदी सरकारवर जोरदार टीका

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : कथित करचुकवेगिरीच्या तपासाअंतर्गत प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयात ‘सर्व्हे ऑपरेशन’ केले. मात्र, 2002च्या गुजरात दंगलीसंदर्भात बीबीसीने केलेल्या माहितीपटाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने राजकीयदृष्ट्या त्याचे पडसाद उमटले आहेत. काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

बीबीसीच्या कार्यालयावरील आयटी छापे उद्वेगजनक असून मोदी सरकार टीकेला घाबरत असल्याचे त्यातून दिसत आहे. या दडपशाहीच्या प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. ही लोकशाहीविरोधी हुकूमशाही वृत्ती यापुढी चालू शकत नाही, असे ट्वीट काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. तर, ’56 इंचाच्या छातीची व्यक्ती (पंतप्रधान नरेंद्र मोदी) किती भित्री आहे, हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले,’ असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. याशिवाय, ‘बीबीसीवर प्राप्तिकर विभागातर्फे छापा टाकून मोदी सरकार जगाला आपल्या खऱ्या चेहऱ्याचे दर्शन स्वतःच घडवत आहे आणि बीबीसीची भूमिका योग्य होती हेही अधोरेखित करत आहे, असे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

बीबीसीवरील छापेमारी म्हणजे ‘वैचारिक आणीबाणी’ असल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी, सेबीच्या चेअरमनना भेटायला गेलेल्या अदानी यांना ‘फरसाण सेवा’ देण्यात आली, अशी उपरोधिक टीका केली आहे.

बीबीसी कार्यालयावर छापेमारीचे कारण आणि परिणाम तर स्पष्ट आहेत. सत्य बोलणाऱ्यांना निर्लज्जपणे केंद्र सरकार त्रास देत आहे. विरोधी पक्षनेते असो, प्रसारमाध्यमे असो, कार्यकर्ते असो की अन्य कोणीही असो… सत्यासाठी लढण्याची किंमत मोजावीच लागते, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

First Published on: February 14, 2023 5:14 PM
Exit mobile version