करोनामुळे जगावर आर्थिक मंदीचे सावट, २००८ पेक्षाही होणार अवस्था बिकट

जगभरात करोना व्हायरसने हाहाकार उडवला असून आयात निर्य़ातीबरोबरच लहान मोठे व्यवसायही ठप्प झाले आहेत. याचे दूरगामी परिणाम होणार असून संपूर्ण जगावर २००८ पेक्षाही बिकट आर्थिक संकट कोसळेल असे भाकीत नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक स्टिलिट्ज यांनी केले आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक शहर लॉकडाऊन करण्यात आले आहेत. काही ठिकाणी महिनाभरासाठी तर काही ठिकाणी अनिश्चित काळासाठी. याचा थेट परिणाम आर्थिक व्यवस्थेवर झाल्याचे अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक स्टिलिट्ज यांनी सांगितले आहे. हे फक्त आर्थिक संकट नसून प्रत्यक्षात महान संकट आहे. सध्या युरोपमध्ये व्याजदर घटला असून अमेरिकेतही हीच परिस्थिती आहे. हीच आर्थिक परिस्थिती करोनाप्राभावित देशांमध्येही टप्याटप्याने निर्माण होईल. जी २००८ सालच्या आर्थिक मंदीपेक्षाही बिकट असेल. कारण २००८ साली आलेली आर्थिक मंदी हटवण्यासाठी काय करावे लागेल याबदद्ल निश्चित योजना आखण्यात आल्या होत्या. पण आताची परिस्थिती भीषण असून महामारीमुळे सगळेच व्यवहार अनिश्तित काळासाठी बंद करण्यात आले आहे. यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. असे स्टिलिट्ज यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर २०२० साली अमेरिकेबरोबरच इतर राष्ट्रांमध्ये होणाऱ्या राजकीय घडामोडींवरही याचा परिणाम होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: March 22, 2020 1:48 PM
Exit mobile version