रेस्टॉरंटने चक्क पंतप्रधानांना सांगितले; ‘टेबल रिकामा नाही, बाहेर थांबा’

रेस्टॉरंटने चक्क पंतप्रधानांना सांगितले; ‘टेबल रिकामा नाही, बाहेर थांबा’

फोटो प्रातिनिधिक आहे

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी देशात केलेला नियम आता त्यांनाच भारी पडला आहे. कारण चक्क न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांना एका रेस्टॉरंटने प्रवेश नाकारत टेबल रिकामा नसल्याचे सांगत टेबल रिकामे होईपर्यंत रेस्टॉरंटच्या बाहेर वाट बघत उभे रहावे लागले आहे.

नेमके काय घडले?

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन वेलिंग्टनमधील प्रसिद्ध कॅफे ऑलिव्हमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी तिथल्या व्यवस्थापकाने त्यांना रेस्टॉरंटमध्ये येण्यासाठी थांबवले आणि बसण्यासाठी टेबल रिकामा नसल्याचे सांगितले. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, एका युजरने ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. जॉय नावाच्या युजरने म्हटले की, ‘OMG, न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी Olive रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना जागा नसल्याने रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने टेबल रिकामा नसल्याचे सांगत त्यांना बाहेर घालवले.

याकरता दिला नकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये अनेक कठोर नियम घालण्यात आले आहेत. त्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार रेस्टॉरंटमध्ये १०० लोकांनाच परवानगी आहे. तसेच १ मीटर अंतरावर बसण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसाठी रेस्टॉरंटमध्ये बसण्याची व्यवस्था करता आली नाही. यावर ऑर्डन यांच्या पतीने स्वत:ला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, ‘आधीच टेबल बुक करता आले नाही त्यामुळे हे सर्व झाले आहे’.

त्यानंतर दिली परवानगी

दरम्यान, टेबल रिकामा झाल्यानंतर त्यांना रेस्टॉरंटमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, देशाच्या पंतप्रधान असून देखील त्यांना इतर सामान्य नागरिकांप्रमाणे वाट पहावी लागली. तसेच ‘देशाच्या पंतप्रधान आमच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन गेल्या हे माझ्या आठवणीत राहिले’, असे देखील व्यवस्थापकाने सांगितले आहे.

न्यूझीलंडमध्ये दीड हजार नागरिकांना कोरोना

न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त नसून आतापर्यंत दीड हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, असे असताना देखील येथील नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत.


हेही वाचा – अखेर देशभरात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर, नव्या नियमांची घोषणा!


First Published on: May 17, 2020 7:56 PM
Exit mobile version