‘येस बँकेच्या मदतीसाठी SBI ला हुकूम’, पी. चिदंबरम यांचा आरोप

‘येस बँकेच्या मदतीसाठी SBI ला हुकूम’, पी. चिदंबरम यांचा आरोप

पी. चिदम्बरम, माजी केंद्रीय मंत्री

येस बँकेवर प्रतिबंध लावल्यानंतर बँकेतून ग्राहकांना पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. या प्रकरणी संकटकाळी येस बँकेला मदत करण्याची इच्छा स्टेट बँकेने व्यक्त केल्यानंतर ही बँक येस बँकेचा ४९ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यानंतर आता ‘येस बँकेच्या सुटकेसाठी स्टेट बँकेवर दबाव आणला जातोय, असे मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे.

मदतीसाठी एसबीआयला निर्देश

येस बँकेच्या संकटप्रसंगी स्टेट बँक मदतीला धावून आल्या नंतर काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री आणि माजी अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी यावर शंका व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी असे म्हटले आहे की, ‘येस बँकेची या संकटातून सुटका करण्यासाठी एसबीआयला हुकूम देण्यात आल्याचे माझे मत आहे’, असे त्यांनी एका पत्रकार परिषदमध्ये सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत स्टेट बँकने येस बँकेचा काही हिस्सा खरेदी करत या बँकेला मदत करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती शुक्रवारी दिली होती. मात्र यानंतर आता पी चिदंबरम यांनी म्हटले की, ‘ज्याप्रमाणे एलआयसी स्वेच्छेने आयडीबीआय बँकेची सुटका करण्यासाठी तयार नव्हती, तसेच एसबीआय सुद्धा येस बँकेच्या सुटकेसाठी स्वेच्छेने तयार आहे, असे मला वाटत नाही. एसबीआयला तसे निर्देशही देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

‘येस बँक हा निर्णय दबावाखाली येऊन घेत आहे. आर्थिक संस्थांमध्ये भाजप सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तसेच काल सेन्सेक्स ८८४ अंकानी कोसळला असून स्टेट बँकेच्या शेअरचा भाव ३६.८ वरून १६ रूपये झाला,’ असे देखील त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाल्या अर्थमंत्री सितारामन?

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत बँकेच्या खातेदारकांना आश्वस्त करत खात्यातील रक्कम सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, ‘येस बँकेच्या खातेदारकांना घाबरण्याची गरज नाही त्यांचा एकही पैसा बुडणार नाही त्यांची सर्व रक्कम परत दिली जाईल’, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. येस बँकेवर ३० दिवसांसाठी म्हणजे ३ एप्रिलपर्यंत निर्बंध आले असून खातेदारांना जास्तीत जास्त ५० हजार रुपयेच बँकेतून काढता येतील.

First Published on: March 7, 2020 9:29 PM
Exit mobile version