पत्रकार शुजात बुखारींच्या हत्येमागे पाकिस्तान

पत्रकार शुजात बुखारींच्या हत्येमागे पाकिस्तान

पत्रकार शुजात बुखारी हत्या केस (फोटो प्रातिनिधीक आहे)

‘द रायझिंग काश्मीर’ या नियतकालिकाचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमागे पाकिस्तान असल्याचा जम्मू पोलीस दावा करत आहेत. यासंदर्भातील ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीमेपलिकडून आदेश मिळाल्यावरच अतिरेक्यांनी बुखारी यांची हत्या केली आहे, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासाअंती स्पष्ट झाले आहे. जमात-ए-इस्लामी आणि काही कट्टरपंथियांनी या अतिरेक्यांची माथी भडकवली होती. त्यांना शुजात बुखारींची ओळख पटवून दिली आणि ठार करण्यास सांगितले. ज्यामुळे बुखारी मारले गेले, असेही या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हत्या करणाऱ्यांची ओळख पटली आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू आणि कठोर कारवाई करू, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांच्या तपासातून स्पष्ट

शुजात बुखारी यांचे निकटवर्तीय आंदोलक इर्शाद मोहम्मद दुबई येथील शांतता परिषदेला हजर राहणार होते. ही शांतता परिषद काही कट्टरपंथीयांसाठी डोकेदुखी ठरली होती. शुजात बुखारी हे भारताचे पेड एजंट होते, असा आरोप हिजबुल मुजाहिदीनच्या सईद सल्लाऊद्दीनने केल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच बुखारी यांची हत्या करण्याचे आदेश पाकिस्तानातून आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

कोण होते बुखारी?

‘द रायझिंग काश्मीर’ या नियतकालिकाचे संपादक शुजात बुखारी यांची १४ जूनला अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली. काश्मीरच्या शांतता प्रक्रियेसाठी शुजात नेहमीच आग्रही असायचे. काश्मीरचा प्रश्न शांततेने सुटेल, अशी त्यांची भूमिका होती. केंद्र सरकारने रमजाननिमित्त जाहीर केलेल्या शस्त्रसंधीचेही त्यांनी स्वागत केले होते. काश्मीरमध्ये मानवाधिकाराच्या होणाऱ्या उल्लंघनाबाबतही त्यांनी आवाज उठवला होता.

First Published on: June 26, 2018 10:16 AM
Exit mobile version