कुलभूषण जाधव यांना दिलासा; पाकिस्तान संसदेत शिक्षेच्या समीक्षेसाठीचे विधेयक मंजूर

कुलभूषण जाधव यांना दिलासा; पाकिस्तान संसदेत शिक्षेच्या समीक्षेसाठीचे विधेयक मंजूर

कुलभूषण जाधव

पाकिस्तानमध्ये कैद असलेले भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. हेरगिरीच्या आरोपांतर्गत पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली असून सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठी पाकिस्तानच्या संसदेत एक विधेयक मंजूर करण्यात आले असल्याची वृत्त एएनआयने ट्विट करत दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (समिक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश, असे या विधेयकाचे नाव आहे. या विधेयकाला पाकिस्तानच्या संसदेत (नॅशनल असेंब्ली) विरोध करण्यात आला. मात्र कायदा आणि न्यायसंबंधी स्थायी समितीने चर्चा करुन या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

दरम्यान, हे विधेयक मंजूर केलेल्या समितीत सहभागी असलेले पाकिस्तानचे न्याय आणि कायदा मंत्री फरोग नसीम म्हणाले की, हे विधेयक आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी आणण्यात आले आहे. जर या विधेयकाला नॅशनल असेंब्लीमध्ये मंजुरी मिळाली नसती तर पाकिस्तानला आंतराराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचे पालन न करण्याबद्दल प्रतिबंधांचा सामना करावा लागला असता. हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने जुलै २०१९ मध्ये दिलेल्या निर्णयात पाकिस्तानने जाधव यांच्या शिक्षेबाबत समिक्षा आणि पुनर्विचार करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कोर्टाने भारताला विनाविलंब जाधव यांच्यापर्यंत कायदेशीर मदत पोहोचवण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा –

कोरोनाची लसही बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात

First Published on: October 22, 2020 3:06 PM
Exit mobile version