गेल्या 75 वर्षांपासून कटोरा घेऊन फिरतोय, सांगणाऱ्या शरीफ यांचे मसूद अजहरबाबत मौन

गेल्या 75 वर्षांपासून कटोरा घेऊन फिरतोय, सांगणाऱ्या शरीफ यांचे मसूद अजहरबाबत मौन

समरकंद (उझबेकिस्तान) : पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असतानाच तिथे पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे स्थिती आणखी बिकट झाली आहे. यावर भाष्य करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की, गेल्या 75 वर्षांपासून आम्ही कटोरा घेऊन फिरत आहोत. कायम भीक मागणारा देश. या नजरेने आता मित्र राष्ट्रही आमच्याकडे पाहू लागले आहेत, तथापि, प्रसार माध्यमांनी त्यांना आतंरराष्ट्रीय दहशतवादी मौलान मसूद अजहरबाबत विचारले असता त्यांनी मौन बाळगले.

आर्थिक आणीबाणीमुळे श्रीलंकेत अराजकता निर्माण झाली होती. आता पाकिस्तानही आर्थिक गर्तत सापडला आहे. यावर्षी पावसाने धुमाकूळ घातल्याने तिथे सर्वत्र पूरस्थिती आहे. देशाचा एक-तृतीयांश भाग पाण्याखाली आहे. त्यामुळे पाकिस्तानला 30 ते 40 अब्ज डॉलर्सचा फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आर्थिक स्थितीची माहिती देताना सांगितले की, छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थेने देखील आम्हाला मागे टाकले आहे. मित्र राष्ट्रांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल वक्तव्य केले आहे. आम्ही जर एखाद्या मित्र राष्ट्राकडे गेलो किंवा फोन जरी केला तरी, आम्ही त्यांच्याकडे पैसे मागायला आलो आहोत, असे ते मानतात, असे ते म्हणाल्याचे स्थानिक वृत्तपत्र ‘डॉन न्यूज’ने म्हटले आहे.

मसूदबाबत तोंडावर बोट
शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी भारतीय पंतप्रधान समरकंदमध्ये दाखल झाले असून तिथे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासह इतर नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. शहाबाज शरीफ देखील तिथे गेले असून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर याच्याबद्दल प्रसार माध्यमांनी विचारले असता उत्तर न देताच ते पुढे निघून गेले.

पाकिस्तानी शिष्टमंडळासह शहाबाज शरीफ जात असताना, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरवर कारवाई करणार का, असा प्रश्न माध्यमांनी केला. पण शरीफ यांनी उत्तर दिले नाही. त्याचबरोबर शरीफ यांच्यासमवेतच्या सुरक्षारक्षकांनी सुद्धा पत्रकारांना प्रश्न विचारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातीलच एक जण म्हणाला, माझ्या मते एवढे पुरेसे आहे.

First Published on: September 16, 2022 10:27 PM
Exit mobile version