आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता ‘अल्लाह’चा भरवसा, पाक अर्थमंत्र्यांचे वक्तव्य

आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानला आता ‘अल्लाह’चा भरवसा, पाक अर्थमंत्र्यांचे वक्तव्य

इस्लामाबाद : पाकिस्तान आर्थिक गर्तेत सापडला असून तेथील सरकार आता ‘अल्लाह’च्या भरवशावर आहे, असे दिसते. इस्लामच्या नावाने स्थापन झालेला पाकिस्तान हा एकमेव देश आहे. त्यामुळे त्याच्या विकास आणि समृद्धीची जबाबदारी ‘अल्लाह’ची आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी शुक्रवारी केले आहे. विदेशी गंगाजळी जवळपास आटलेली असल्याने आयातीची रक्कम कशी अदा करायची, या प्रश्नाने पाकिस्तान त्रस्त आहे. अशा परिस्थितीत देशातील जनतेची नाराजी कमी करण्यासाठी इशाक डार यांनी धार्मिक कार्ड खेळण्यास सुरुवात केली असल्याचे मानले जाते.

येथे ग्रीन लाइन एक्स्प्रेस ट्रेन सेवेच्या उद्घाटन समारंभात पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) ज्येष्ठ नेते इशाक डार यांनी उपस्थितांना संबोधित केले. इस्लामच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यामुळे त्याची प्रगती होईल, असा मला विश्वास आहे. जर अल्लाह पाकिस्तानची निर्मिती करू शकतो, तर तो त्याचे संरक्षण, विकास आणि समृद्धीही करू शकतो, असे डार म्हणाले. पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘नाटका’मुळेच पाकिस्तानची अशी दुरवस्था झाली असून त्याचे परिणाम येथील जनता अजूनही भोगावे लागत आहेत. या नाटकापूर्वी, 2013-17दरम्यानच्या नवाझ शरीफ यांच्या कार्यकाळात पाकिस्तानची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत होती, असे सांगत त्यांनी तत्कालीन इम्रान खान यांच्या सरकारवर निशाणा साधला.

नवाज यांच्या राजवटीत पाकिस्तान प्रगतीच्या मार्गावर होता, पण ही घडी विस्कटवण्यात आली, असा आरोप डार यांनी केला. गेल्या पाच वर्षांत देशाला किती नुकसान सोसावे लागले, हे नागरिकांनी पाहिले आहे. परकीय चलनाचा तुटवडा असल्याने पाकिस्तानकडे आता अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देखील पैसे शिल्लक नाही. या समस्येतून बाहेर येण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक संस्थांकडून आर्थिक पॅकेजच्या शोधात देश असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: January 28, 2023 1:55 PM
Exit mobile version