Parivarvaad : आम्हीच मोदींना गोल करण्याची संधी दिली, ओमर अब्दुल्लांचा लालूंवर निशाणा

Parivarvaad : आम्हीच मोदींना गोल करण्याची संधी दिली, ओमर अब्दुल्लांचा लालूंवर निशाणा

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात लढण्यासाठी विरोधकांनी ‘इंडिया’ ही आघाडी उभी केली असली तरी, त्यातील काही पक्षांचे सूर अद्याप जुळले नसल्याचेच दिसते. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी कुटुंबासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण झाला आहे. त्याला उत्तर देताना भाजपाने सोशल मीडियावर ‘मोदी का परिवार’ नावाने मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात बोलताना नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी लालूप्रसाद यादव यांच्यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray : अबकी बार भाजपा तडीपार; उद्धव ठाकरेंचा अमित शहा, फडणवीसांवर पलटवार

विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाने रविवारी (3 मार्च) बिहारमध्ये मेगारॅली काढली होती. याच रॅलीत राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या टीकेवरून वाद निर्माण झाला आहे. नरेंद्र मोदी आजकाल परिवारवादावर भाष्य करीत आहेत. लोकांना जास्त मुले असण्याबाबत पंतप्रधान म्हणतात की, लोक कुटुंबासाठी लढत आहेत. तुम्हाला तर कुटुंब नाही, अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. आता भाजपाने याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर ‘मोदी का परिवार’ नावाचे अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाइलसमोर ‘मोदी का परिवार’ असे लिहित आहेत.

लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेल्या टीकेवर ओमर अब्दुल्ला यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मी अशा घोषणांचे कधीच समर्थन करत नाही आणि त्यांचा आम्हाला कधीच फायदा झाला नाही. यातून काहीही साध्य होत नाही. मतदारांवर या घोषणांचा काहीही परिणाम होत नाही. उलट त्यांना भेडसावत असलेल्या समस्या कशा सोडवता येतील, यावर भर दिला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, वास्तविक अशी विधाने करून आपण सेल्फ गोल करतो.. पंतप्रधान मोदी यांना गोल करू देतो. आपण लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत; चौकीदार, अदानी-अंबानी, राफेल, कुटुंब… या गोष्टी चालत नाहीत.

हेही वाचा – BJP : सर्वसामान्य कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री होऊ शकतो; मातोश्रीवर अपमानच होतो; भाजपाचा राऊतांवर हल्लाबोल

पीडीपीसमवेत जागावाटप नाही

लोकसभा निवडणुकीसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसोबत (पीडीपी) जागावाटप करण्यास ओमर अब्दुल्ला यांनी नकार दिला. नॅशनल कॉन्फरन्सला हातातील जागा सोडाव्या लागतील, हे आधी सांगितले असते तर त्यांचा पक्ष इंडियामध्ये सामील झाला नसता, असे सांगून ते म्हणाले, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी काँग्रेससाठी जागा सोडायला सांगितले तर, पीडीपीऐवजी काँग्रेसला जागा सोडणे पसंत करू. येथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पीडीपी तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाला सत्तेत आणल्यानंतर तसेच जनतेच्या जनादेशाचा अवमान केल्यानंतर पीडीपीकडे विश्वासार्हता उरलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Politics: उद्धव ठाकरेंनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने…; फडणवीसांचा खोचक टोला

First Published on: March 8, 2024 4:24 PM
Exit mobile version