TDP एनडीएविरोधात मांडणार अविश्वासदर्शक ठराव

TDP एनडीएविरोधात  मांडणार अविश्वासदर्शक ठराव

TDP एनडीएविरोधात मांडणार अविश्वासदर्शक ठराव ( फोटो सौजन्य - Hindustan times )

भाजपप्रणित एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात आता विरोधक आक्रमक झालेले पाहायाला मिळत आहेत. याचेच चित्र आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये दिसणार आहे. केंद्र सरकारवर नाराज असलेली टीडीपी अर्थात तेलगु देसम पार्टी एनडीएविरोधात अविश्वास दर्शक ठराव मांडणार आहे. आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करून देखील केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केल्याने एन. चंद्रबाबु नाराज आहेत. शिवाय, पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. विरोधकांनी देखील टीडीपीला याच मुद्यावरून कोंडीत पकडल्याने टीडीपी आता आक्रमक झालेली पाहायाला मिळत आहे. विशेषता जगमोहन रेड्डी यांनी राज्याला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी टीडीपीला अपयश आल्याचे सांगत एन. चंद्रबाबु नायडू यांच्यावर टीका केली आहे. आगामी निवडणुकीत विशेष राज्याच्या दर्जावरून वायएसआर काँग्रेस टीडीपीला खिंडीत गाठण्याची शक्यता आहे. भाजपच्या दक्षिणेतील जुन्या मित्रपक्षांपैकी एक पक्ष म्हणजे टीडीपी. पण नाराज असलेल्या एन. चंद्रबाबु नायडू यांनी मार्चमध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आंध्रला विशेष दर्जा का हवा?

२०१४ साली आंध्रप्रदेशचे विभाजन होऊन स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. यावेळी राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे वचन दिले गेले. त्यामुळे राज्याला केंद्राकडून जास्तीचा विकासनिधी देण्यात येणार होता. पण, भाजपप्रणित एनडीए सरकारने आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार दिला. त्यानंतर एन. चंद्रबाबु नायडू आक्रमक झाले आहेत. याच मुद्याला पकडून एन. चंद्रबाबु नायडू १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात एनडीएविरोधात अविश्वास दर्शक ठराव मांडणार आहेत. सत्तेत राहुन देखील राज्याला विशेष दर्जा मिळवण्यास टीडीपीला अपयश आले. याच मुद्यावरून वायएसआर काँग्रेसचे जगमोहन रेड्डी यांनी टीडीपाला लक्ष्य केले. त्यामुळे टीडीपीला आगामी विधानसभा निवडणुकीत विशेष राज्याच्या दर्जावरून फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे एन. चंद्रबाबु नायडू आता आक्रमक झाले आहेत.

First Published on: July 13, 2018 4:45 PM
Exit mobile version