आम्ही कोरोनावर औषध बनवलंच नाही; पतंजलीचा यू-टर्न

आम्ही कोरोनावर औषध बनवलंच नाही; पतंजलीचा यू-टर्न

कोरोनावर औषध बनवल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीने आता यू-टर्न घेतला आहे. मागील आठवड्यात कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत ते औषध बाजारात आणलं होतं. मात्र, या औषधावर केंद्रीय आयुष मंत्रालयाने बंदी या औषधाच्या प्रचारावर आणि विक्रीवर बंदी घातली. त्यानंतर उत्तराखंड सरकारने पतंजलीला नोटीस पाठवली होती. यावर उत्तर देताना पतंजलीने आम्ही कोरोनावर औषध बनवलंच नाही, असा यू-टर्न घेतला आहे.

बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली आयुर्वेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी २३ जूनला पत्रकार परिषद घेऊन कोरोनाशी सामना करण्यासाठी ‘कोरोनिल’ हे औषध तयार केल्याचा दावा करत हे औषध बाजारात आणलं होतं. यानंतर काही तासांतच केंद्रीय आयुष मंत्रालयाने औषधाच्या प्रचार आणि विक्रीवर बंदी आणण्याचे आदेश दिले. यासह, औषधाची चाचणी कधी केली आणि त्यात कोणत्या घटकांचा समावेश आहे याचा तपशील कंपनीकडून मागविला गेला.

इतकेच नाही तर २४ जून रोजी उत्तराखंड आयुष विभागाने पतंजलीला नोटीस बजावली आणि ७ दिवसात या संदर्भात जाब विचारला. रोग प्रतिकारशक्ती बूस्टर तयार करण्यासाठी परवाना देण्यात आल्याचं उत्तराखंडच्या आयुष विभागाचा परवाना अधिकाऱ्यांनी सांगितलं. पतंजलीने कोरोनावर औषध तयार केल्याचं म्हटलं नव्हतं, असा खुलासा उत्तराखंडच्या आयुष विभागाने केला. राजस्थान आणि महाराष्ट्राने पतंजलीच्या या औषधावर बंदी घातली आहे. राज्यात पतंजलीच्या औषधाची जाहिरात करण्यात आली किंवा विक्री झाल्यास कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं दोन्ही राज्यांनी म्हटलं आहे. या संकटात पतंजलीने असा प्रयत्न केला ही चांगली गोष्ट आहे, परंतु नियमांचे पालन करण्याची गरज आहे. शिवाय, मंत्रालयाची मंजुरी घ्यायला हवी होती, असं केंद्रीय आयुषमंत्र्यांनी म्हटलं होतं.

 

First Published on: June 29, 2020 6:58 PM
Exit mobile version