कूलरसाठी व्हेटिंलेटरचा प्लग काढला आणि…

कूलरसाठी व्हेटिंलेटरचा प्लग काढला आणि…

कूलरसाठी व्हेटिंलेटरचा प्लग काढला आणि...

राजस्थानच्या कोटामधील एका शासकीय रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. कूलरसाठी व्हेटिंलेटरचा प्लग काढल्याने एका ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याने कूलर सुरु करण्यासाठी चुकून व्हेंटिलेटरचा प्लग काढल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली असून ही समिती या प्रकरणाचा शोध घेत आहे.

नेमके काय घडले?

एका व्यक्तीला १३ जून रोजी कोरोनाची बाधा झाल्याचा संशय होता. त्यामुळे त्या व्यक्तीला महाराव भीम सिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या रुग्णाचा तपासणीनंतर अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, सुरुवातीला या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु, त्या अतिदक्षता विभागात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्या रुग्णाला १५ जून रोजी विलगीकरण वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. मात्र, या विलगीकरण कक्षात खूप उकडत होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी रुग्णासाठी कूलर खरेदी केला. परंतु, हा कूलर लावण्यासाठी वॉर्डात प्लग सापडला नाही. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी व्हेंटिलेटरचा प्लग काढला, असा आरोप केला जात आहे. प्लग काढल्यानंतर अर्ध्या तासाने व्हेंटिलेटरची पॉवर संपल्याने रुग्णाची तब्येत खालावली. त्यानंतर तात्काळ डॉक्टर आणि नर्सला बोलावण्यात आले. मात्र, तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला.

कुटुंबांचे सहकार्य नाही

रुग्णालयातील तीन सदस्यीय समितीमधील उपअधीक्षक, परिचारीका अधीक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी हे या प्रकरणाचा तपास करतील, असं रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नवीन सक्सेना यांनी सांगितले आहे. तसेच शनिवारी रात्रीपर्यंत त्यांना त्यांचा अहवाल सादर करायचा आहे. विलगीकरण कक्षातील मेडिकल स्टाफचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र, मृतकाच्या कुटुंबातील लोक कुठल्याही प्रकारचा सहकार्य करत नाही, असंही डॉ. नवीन सक्सेना यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – MP: राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपा आमदार पॉझिटिव्ह!


 

First Published on: June 20, 2020 6:25 PM
Exit mobile version