मांजरांनाही होतो Corona; ब्रिटनमध्ये सापडली पहिली केस!

मांजरांनाही होतो Corona; ब्रिटनमध्ये सापडली पहिली केस!

प्रातिनिधिक छायाचित्र

जगभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना त्या चिंतेत अधिक भर घालणारी बाब आता समोर आली आहे. घरातल्या पाळीव प्राण्यांमध्ये कोरोनाचे विषाणू सापडल्याची काही प्रकरणं युरोप, उत्तर अमेरिका आणि आशिया खंडातल्या काही भागांमध्ये समोर आली होती. त्यात आता मांजराचाही समावेश झाला आहे. मांजरांमध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याची पहिली केस ब्रिटनमध्ये सापडली आहे. यासंदर्भात ब्रिटिश आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या मांजराला तिच्या मालकापासून कोरोनाची लागण झाली होती. कारण, तिच्या मालकाला देखील काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. मात्र, या मांजराकडून इतर प्राण्यांना किंवा इतर माणसांना कोरोनाचा विषाणू संसर्गित झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप सापडला नाही. यासंदर्भात WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेला माहिती देण्यात आली असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

मालकालाही झाला होता कोरोना!

बुधवारी, म्हणजेत २२ जुलै रोजी या मांजराला SARC-CoV-2 या विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. Covid-19 होण्यासाठी हाच विषाणू कारणीभूत होतो. मात्र, आता हे मांजर आणि तिच्या मालकाचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पण या मांजराकडून इतर प्राण्यांकडे किंवा इतर माणसांकडे या विषाणूचा फैलाव झाला आहे की नाही, याबद्दल सध्या संशोधन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन प्रशासनाकडून लोकांना पाळीव प्राणी किंवा इतर कोणत्याही प्राण्याच्या संपर्कात आल्यानंतर हात नियमितपणे धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्राण्यांकडून माणसाला संसर्ग होऊ शकतो?

दरम्यान, ही पहिलीच केस असल्यामुळे यामध्ये घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तरी देखील या प्रकरणाचा अधिक तपास केल्यानंतर प्राण्यांकडून माणसांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? यावर निश्चित उत्तर मिळू शकणार आहे. याच विषयावर WHOमध्ये देखील संशोधन सुरू असून त्यावर आधारित काही निरीक्षणं जागतिक आरोग्य संघटनेकडून नियमितपणे त्यांच्या वेबसाईटवर प्रसारित केली जातात.

First Published on: July 27, 2020 7:21 PM
Exit mobile version