EPFO : लॉकडाऊनच्या संकटात PF ठरला आधार, १ कोटी लोकांनी काढले PF मधून पैसे, महाराष्ट्र ठरला अव्वल

EPFO : लॉकडाऊनच्या संकटात PF ठरला आधार, १ कोटी लोकांनी काढले PF मधून पैसे, महाराष्ट्र ठरला अव्वल

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देशात कोरोनाचं संकट घोंघावत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली असता देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात पर्यायानं नोकरी-व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला. लोकांच्या हातात येणारा पैसा थांबला आणि हातात असलेला पैसाही निघून गेला. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक भार पीएफवर आला होता. यावेळी १ कोटींहून अधिक लोकांनी पीएफमधून पैसे काढले होते. यामध्ये महाराष्ट्र सर्वाधिक प्रमाणात पुढे आहे.

कोरोना काळात असंख्य जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि व्यवसाय बंद पडले. अशावेळी ज्यांचे EPFO खाते होते, त्यांनी सरकारच्या या योजनेचा फायदा घेत पैसे काढले. मात्र, EPFO शी दूरचा संबंध नसलेला असा मोठा वर्ग आहे, ज्यांनी घरातले सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवूनही पैसे जमा केले.

तीन महिन्याचं वेतन आणि डीएच्या बरोबरीची रक्कम किंवा पीएफ खात्यामध्ये जमा झालेली एकूण रकमेपैकी ७५ टक्के रक्कम काढण्याची मुभा सरकारने कर्मचाऱ्यांना दिल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. भारत सरकारच्या या घोषणेचा फायदा घेत, लॉकडाऊनमध्ये आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अनेक पीएफ खातेधारक पुढे सरसावले.

लॉकडाऊनच्या काळातच पीएफमधून सर्वाधिक पैसे काढणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. तर तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच कर्नाटक तिसऱ्या, दिल्ली चौथ्या आणि तेलंगणा पाचव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून २०२० मध्ये ११ लाख २६ हजार ९१५ खातेदारांनी पैसे काढले आणि यातून २९ अब्ज ९५ कोटी ४८ लाख ६७ हजार १७० रुपये काढले गेले.


हेही वाचा : पुरातत्व विभागाशी संपर्क साधून विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करणार – गहिनीनाथ महाराज औसेकर


 

First Published on: April 12, 2022 10:13 AM
Exit mobile version