२२ मार्चच्या जनता कर्फ्यूला संसदेत सर्वपक्षीयांचं समर्थन!

२२ मार्चच्या जनता कर्फ्यूला संसदेत सर्वपक्षीयांचं समर्थन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

येत्या २२ मार्चला, म्हणजेच रविवारी सकाळी ७ वाजेपासून ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी देशाला संबोधून केलेल्या भाषणात केलं आहे. या आवाहनाला सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांमध्ये सगळ्यांनीच पाठिंबा दिलेला असतानाच आता देशाच्या संसदेमध्ये देखील जनता कर्फ्यूला समर्थन मिळालं आहे. संसदेमध्ये सर्वपक्षीय खासदारांनी जनता कर्फ्यूसाठी सरकारच्या बाजूने असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे रविवारी देशभरात जनता कर्फ्यू यशस्वी होणार असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यासाठी सर्वच पक्षाच्या खासदारांचं कौतुक केलं आहे.

५ वाजता होणार थाळीनाद!

रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेमध्ये देशभरातील नागरिकांनी स्वत:हून निर्बंध घालून घेत घरातच थांबावं, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच कामासाठी घराबाहेर पडावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. त्यासोबतच, रविवारी संध्याकाळी ५ वाजता सगळ्यांनी आपल्या घराच्या दारात, बाल्कनीमध्ये उभं राहून जे जे डॉक्टर, नर्स, पोलीस, जीवनावश्यक सेवा देणारे कर्मचारी करोनाच्या संकटामध्ये देखील सामान्यांना सेवा देण्यासाठी झटत आहेत, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या वाजवण्याचं किंवा थाळी वाजवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

दरम्यान, भारतामध्ये करोनाग्रस्तांचा आकडा २००च्या पुढे जाऊन पोहोचला असून हे वृत्त प्रकाशित करेपर्यंत २२५ भारतीयांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं देखील आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन देशभरातल्या राज्य सरकारांनी उपाययोजना सुरू केल्या आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या चार शहरांमध्ये फक्त मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतर सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – आता ३१ मार्च नव्हे, पुढील आदेश येईपर्यंत सध्याचे निर्णय लागू, अजित पवारांची घोषणा!
First Published on: March 20, 2020 6:52 PM
Exit mobile version