४ पिढ्यांचा हिशोब द्या, मग ४ वर्षाचा देईन – मोदी

४ पिढ्यांचा हिशोब द्या, मग ४ वर्षाचा देईन – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरून भाषण करायचा अधिकार केवळ एकाच कुटुंबाला आहे. पण, एका चहावाल्याला सत्ता मिळाल्यानं काँग्रेसची झोप उडाली आहे. देशातील चार पिढ्यांनी काँग्रेसच्या सत्तेचा अनुभव घेतला आहे. तुम्ही चार पिढ्यांसाठी काय केले याचा हिशोब द्या, मग मी चार वर्षामध्ये काय केले याचा हिशोब देईन अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. २०१४ साली लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी अंबिकापूरला आलो होतो. त्यावेळी लाल किल्ल्याची प्रतिकृती तयार केली गेली होती. पण, लोकांना मोदी लाल किल्ल्यावरून कसे भाषण करू शकतात असा प्रश्न लोकांना पडला होता. अशा लोकांना उत्तर देण्याची संधी तुम्हाला दुसऱ्यांना मिळतेय असे आव्हान देखील मोदींनी यावेळी लोकांना केले.

सरकार हे केवळ श्रीमंतांचे, गरिबांचे असे काही नसते. सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र आहे. भाजपला मतदान न करणाऱ्या लोकांचा देखील आम्हाला विकास करायचा आहे. असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. छत्तीसगड राज्याची निर्मिती झाली त्यावेळी केंद्रात वाजपेयींचे सरकार होते. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यानंतर देखील छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाले. दरम्यान या ठिकाणी बसलेला एकही व्यक्ती नोटाबंदीमुळे रडत नाही आहे. केवळ एका कुटुंबाचं नोटाबंदीवरून रडगाणं सुरू असल्याची टिका यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी कुटुंबावर केली. छत्तीसगडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फौरी झडताना दिसत आहे.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान १८ जागांसाठी सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी मतदान झालं. तर, दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे २० नोव्हेंबर रोजी होणार असून ११ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. पण, छत्तीसगडची जनता कुणाला साथ देते यासाठी आता ११ डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

वाचा – छत्तीसगड विधानसभा निवडणूक : काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस

First Published on: November 16, 2018 2:26 PM
Exit mobile version