PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान मोदींनी बळीराजाच्या खात्यात २ हजार रूपयांचा हप्ता पाठवला

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान मोदींनी बळीराजाच्या खात्यात २ हजार रूपयांचा हप्ता पाठवला

देशातील सर्वच बळीराजा ज्या संकटांशी सामना करतोय. ते सगळ्यांचा माहित आहे. शेतकऱ्याच्या समस्या कोणापासूनही लपलेल्या नाहीत. सरकार शेतकर्‍यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोना महामारीदरम्यान, जवळपास प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती खूप बेताची झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवित आहे. आज एका सरकारी योजनेंतर्गत सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपयांची भर घातली आहे. आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा आठवा हप्ता जाहीर केला असून तो बळीराजाच्या खात्यात थेट पाठवला आहे.

या अंतर्गत ९.५ कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांना १९ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच ९.५ कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) २ हजार रूपये पाठविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आर्थिक लाभाचा आठवा हप्ता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाहीर केला. कोरोना काळातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे. या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात आल्याची माहिती आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीमार्फत जमा केली जाते.

डिसेंबर २०१८ मध्ये केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेल्या या योजनेंतर्गत देशातील छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ केवळ त्या शेतकऱ्यांनाच मिळू शकेल ज्यांच्याकडे २ हेक्टर किंवा शेतीसाठी कमी जमीन आहे.

मोदींनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

यावेळी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मेघालय, जम्मू-काश्मीर अशा पाच राज्यांतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण कोरोना सारख्या अत्यंत आव्हानात्मक काळात संवाद साधत आहोत. या कोरोना काळातही देशातील शेतकऱ्यांनी आपल्या कृषी क्षेत्रात विक्रम नोंदविला आहे आणि विक्रमी धान्य उत्पादन केले याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुकही केले.

असं बघा PM Kisan Scheme चं स्टेटस

सर्वप्रथम PM Kisan च्या संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ वर जाऊन भेट द्या. यानंतर ‘Farmers Corner’ अंतर्गत ‘Beneficiary Status’ वर क्लिक करा. आता तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाइल नंबर आणि खाते क्रमांक वरून कोणताही पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या PM Kisan Scheme चं स्टेटस बघता येणार आहे.

First Published on: May 14, 2021 1:05 PM
Exit mobile version