कोरोना लसीकरणाचा विक्रम: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी देशात २ कोटी नागरिकांना दिली लस

कोरोना लसीकरणाचा विक्रम: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी देशात २ कोटी नागरिकांना दिली लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय जनता पक्षातर्फे कोरोनाच्या मोठ्या लसीकरण मोहीमेंतर्गत लसीकरणाचा नवा विक्रम झाला आहे. आज म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी २ कोटीहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. यापूर्वी, दुपारी १.३० पर्यंत देशभरात लसीकरणाची संख्या १ कोटी पार झाली होती. त्याचवेळी, दुपारी २.३० वाजेपर्यंत हा आकडा १.२५ कोटींच्या पुढे गेला आहे. तर केवळ ९ तासात भारताने २ कोटीहून अधिक लोकांना कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण करण्याचा विक्रम केला आहे. लसीकरण कार्यक्रमाची गती यावरून लक्षात येते की, प्रत्येक सेकंदाला ५२७ पेक्षा जास्त डोस देण्यात येत आहेत. प्रत्येक तासाला १९ लाखांपेक्षा जास्त डोस दिले गेल्याची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लसीचे ७७.७७ कोटींपेक्षा जास्त डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लसीचे ६.१७ कोटींपेक्षा जास्त डोस आहेत. देशभरात या मेगा लसीकरणासाठी भाजपने ६ लाखांहून अधिक स्वयंसेवकांची फौज तयार केली होती. जे लोकांना लसीकरण मोहिमेत सामील होण्यास मदत करत होते. हे जगातील सर्वात मोठे स्वयंसेवक कार्यक्रम म्हणून वर्णन केले जात आहे. अहवालांनुसार, एका दिवसात १.५ कोटी लसीकरण करण्याचे भाजपचे लक्ष्य होते.

या अगोदर २७ ऑगस्ट रोजी १.३ कोटी नागरिकांना डोस देण्यात आले. ३१ ऑगस्टला १.३३ कोटी नागरिकांना डोस देण्यात आला. ६सप्टेंबर १.१३ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आज १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी दीड कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दोन कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी दिली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी २० दिवसांची सेवा आणि समर्पण मोहीम सुरू केली आहे, जी ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या काळात मोदींनी सार्वजनिक जीवनात दोन दशके पूर्ण केल्याचा आनंद साजरा केला जाणार आहे.


First Published on: September 17, 2021 8:16 PM
Exit mobile version