भारतातील सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करत मोदी म्हणाले, ‘अजून कोरोनाचा धोका टळला नाही’

भारतातील सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करत मोदी म्हणाले, ‘अजून कोरोनाचा धोका टळला नाही’

पंतप्रधान नरेंद्र मोदी

१ जुलैला दरवर्षी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून डॉक्टर्स डे (National Doctors’ Day) साजरा केला जातो. देशातील महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधन चंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि पुण्यातिथी याच दिवशी आहे. त्यामुळे रॉय यांच्या स्मरणार्थ देशभरात डॉक्टर्स डे साजरा केला जातो. यानिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील डॉक्टर्सना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘कोरोना काळाच्या दरम्यान आपल्या डॉक्टर्सनी ज्याप्रकारे देशाची सेवा केली, ही एक प्रेरणा आहे. याकाळात डॉक्टरांचे मोलाचे योगदान आहे. सर्व भारतीय डॉक्टरांचे आभार व्यक्त करतो, डॉक्टर्स देवाचे दुसरे रुप आहे.’

पुढे मोदी म्हणाले की, ‘जेव्हा देश कोरोना विरोधात लढाई लढत होतो, तेव्हा डॉक्टरांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले. अनेक डॉक्टरांना आपल्या अथक प्रयत्नात आपले बलिदान दिले. मी त्या सर्व डॉक्टर्सना श्रद्धांजली अर्पण करतो. आमच्या सरकारने आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान आम्ही आपल्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे वाटप केले होते. यावर्षी आरोग्य सेवेसाठी २ लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांचे वाटप झाले आहे.’

‘इतक्या दशकांमध्ये ज्याप्रकारे वैद्यकीय पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या, त्याच्या सीमा तुम्हाला माहिती आहेत. पूर्वीच्या काळात वैद्यकीय पायाभूत सुविधांकडे कशाप्रकारे दुर्लक्ष केले गेले होते, त्याची आपल्याला जाणीव आहे. पण आमच्या सरकारचे लक्ष वैद्यकीय पायाभूत सुविधांवर आहे. वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांची एक क्रेडिट गारंटी स्कीम घेऊन येणार आहोत. जिथे आरोग्य सुविधा कमी आहे. आमचे सरकार आमच्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध आहे. गेल्या वर्षी डॉक्टरांच्या विरोधात होणार गुन्ह्यांविरोधात अनेक तरतुदी आणल्या गेल्या होत्या. दरम्यान देशात सध्या नवीन एम्स रुग्णालये खोलले जात आहेत. तसेच नवीन मेडिकल कॉलेज तयार केले जात आहे,’ असे मोदी यांनी सांगितले.

First Published on: July 1, 2021 4:16 PM
Exit mobile version