अयोध्या निकाल काहीही येवो, शांतता राखावी – पंतप्रधान

अयोध्या निकाल काहीही येवो, शांतता राखावी – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात येणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. याचपार्श्वभूमीवर संपूर्ण देशात कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत देशातील जनतेला शांतता काय राखण्याचे आवाहन देखील केले आहे.

काय म्हणाले मोदी

अयोध्येचा निकाल येणार आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या जमीन वादाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या निवृत्तीदिनापर्यंत म्हणजे १७ नोव्हेंबपर्यंत सुप्रीम कोर्ट या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता होती. बहुप्रतिक्षेनंतर अखेर सरन्यायाधीश गोगोई या खटल्याच्या निकालाचे वाचन आज करणार आहेत. या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले असून या पार्श्वभूमीवर मागील आठवडाभरापासून देशातील कानाकोपर्‍यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

काय होते प्रकरण?

सुरुवातीला कनिष्ठ न्यायालयात या मुद्यावर पाच खटले दाखल करण्यात आले होते. रामलल्लाचे भक्त गोपाल सिंह विशारद यांनी १९५० मध्ये पहिला खटला दाखलकेला. वादग्रस्त जागी हिंदूंना प्रार्थना करण्याच्या हक्काची अंमलबजावणीची मागणी केली होती. त्याच वर्षी, परमहंस रामचंद्र दास यांनीही पूजा सुरू ठेवता यावी यासाठी आणि आता उद्ध्वस्त करण्यात आलेल्या वादग्रस्त घुमटाखाली मूर्ती ठेवण्याच्या परवानगीसाठी खटला दाखल केला होता, मात्र नंतर तो मागे घेतला. यानंतर, निर्मोही आखाड्याने १९५९ साली कनिष्ठ न्यायालयात धाव घेऊन, २.७७ एकर वादग्रस्त जागेवर व्यवस्थापन व पूजाअर्चना यांच्या हक्कांची मागणी केली. त्यानंतर उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने वादग्रस्त मालमत्तेवर हक्क सांगत १९६१ साली कोर्टात दावा दाखल केला.

एका बाजूला हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित असताना ६ डिसेंबर १९९२ रोजी हजारो कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर देशभरात हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण झाले होते. मुंबईत याचे तीव्र पडसाद उमटले होते. महिनाभर जातीय दंगली उसळल्या होत्या. उत्तर प्रदेशातही जातीय तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी या खटल्याचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे कुठेही पुन्हा जातीय तणाव निर्माण होऊ नये, यासाठी देशभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.


हेही वाचा – सरकार भाजपचेच येणार


 

First Published on: November 9, 2019 8:44 AM
Exit mobile version