मेघालय-नागालँडमध्ये ७ मार्च, तर त्रिपुरामध्ये ८ मार्चला शपथविधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित

मेघालय-नागालँडमध्ये ७ मार्च, तर त्रिपुरामध्ये ८ मार्चला शपथविधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ मार्चला मेघालय आणि ८ मार्चला त्रिपुरामध्ये भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष इंडिजिनियस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराच्या (IPFT) युतीच्या नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी माहिती दिली.

नुकत्याच पार पडलेल्या मेघालयातील नॅशनल पीपल्स पार्टीच्या (NPP) नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा 7 मार्चला होणार आहे. याबाबत माजी उपमुख्यमंत्री आणि एनपीपीचे आमदार प्रेस्टन टायन्सांग यांनी शनिवारी माहिती दिली. मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून एनपीपीचे प्रमुख कोनराड संगमा हे शपथ घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

प्रेस्टन टायन्सांग यांनी सांगितले की, भाजप व्यतिरिक्त, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (एचएसपीडीपी) चे दोन आमदार आणि दोन अपक्षांनी देखील एनपीपीला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला आहे आणि आता आमच्याकडे 32 आमदार आहेत. आम्ही इतर राजकीय पक्षांशीही संपर्क साधत असल्यामुळे हा आकडा 38-40 पर्यंत जाऊ शकतो.

८ मार्चला त्रिपुरामध्ये शपथविधी सोहळा
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी शुक्रवारी राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे आपल्या सरकारचा राजीनामा सुपूर्द केला होता. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नवीन सरकार स्थापनेबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. यामुळे त्रिपुराच्या नव्या मुख्यमंत्र्याबाबत सस्पेन्स वाढला आहे. महिला दिनी (८ मार्च) भाजप नेतृत्व केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांना त्रिपुराच्या मुख्यमंत्री बनवू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे झाल्यास भौमिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील. त्रिपुरातील आगरतळाच्या विवेकानंद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा रेवती यांनी शनिवारी याबद्दल माहिती दिली.
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पक्षाचे वरिष्ठ नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा हे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

First Published on: March 5, 2023 8:42 AM
Exit mobile version