ब्रिटनच्या शाही घराण्यावर करोनाचा हल्ला, प्रिन्स चार्ल्स यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसची वक्रदृष्टी ब्रिटनच्या शाही घराण्यावरही पडली असून प्रिन्स चार्ल्स (७१) यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. क्लेरेंस हाऊसने बुधवारी प्रिन्स चार्ल्स यांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे जाहीर केले. तसेच त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चार्ल्स यांची करोना चाचणी स्कॉटलँड येथे करण्यात आली आहे. प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण झाल्याचे कळताच नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. #Prince Charles हा ट्रेंडही सुरू झाला आहे

दरम्यान, चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वी चार्ल्स मोनॅकोचे प्रिन्स अल्बर्ट यांना भेटले होते. त्यानंतरच त्यांची तब्येत बिघडली. तेव्हापासून त्यांनी घराबाहेर पडणेही बंद केले होते. ते घरातूनच काम करत होते. ब्रिटनमध्ये करोनामुळे ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८००० हून अधिक जणांना याची लागण झाली आहे. यामुळे शाही घराण्याकडून नागरिकांना वारंवार हस्तांदोलन करू नये असे बजावून सांगण्यात येत होते.

First Published on: March 25, 2020 5:18 PM
Exit mobile version