धाकदपटशा हे भ्याड लोकांचे हत्यार…, संजय राऊत अटकेवरून प्रियंका गांधींची टीका

धाकदपटशा हे भ्याड लोकांचे हत्यार…, संजय राऊत अटकेवरून प्रियंका गांधींची टीका

नवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे आणि आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यापाठोपाठ प्रियंका गांधी यांनीही केंद्रीताल भाजपाप्रणित सरकारवर टीका केली आहे.

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने रविवारी रात्री उशिरा संजय राऊत यांना अटक केली. पीएमएलए न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. तर, याच प्रकरणात वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. यावरून अलीकडेच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. ‘जो माझ्याविरुद्ध बोलेल त्याला त्रास सहन करावा लागेल, असा स्पष्ट संदेश ‘राजा’चा आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधाकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण शेवटी सत्याचाच विजय होईल आणि अहंकाराचा पराभव होईल, हे हुकूमशहाने लक्षात ठेवावे,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

तर, आता प्रियंका गांधी यांनी देखील ट्वीट करत भाजपावर हल्लाबोल केला आहे. धमकी, कपट-कारस्थान करून सत्ता मिळवणे आणि लोकशाही चिरडून टाकणे हेच भाजपाचे एकमेव लक्ष्य आहे. भाजपाच्या कपट-कारस्थानी राजकारणाला न घाबरता त्याचा सामना करत असल्याने खासदार संजय राऊत आणि त्यांच्या परिवाराला लक्ष्य केले जात आहे. धाकदपटशा हे भ्याड लोकांचे हत्यार आहे, पण सत्याच्या मारापुढे हे टकणार नाहीत, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

याआधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनीही, आपण संजय राऊत यांच्यासोबत असल्याचे म्हटले होते. भाजापाच्या धाकदपटशाच्या राजकारणासमोर संजय राऊत झुकले नाहीत, हा एकच गुन्हा त्यांनी केला आहे, असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा – भारतीय सागरी सीमेचे संरक्षण महिलांच्या खाद्यांवर, नौदलाची विशेष मोहीम यशस्वी

First Published on: August 5, 2022 10:12 AM
Exit mobile version