खोटं कधीना कधी उघडं पडतच; प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा

खोटं कधीना कधी उघडं पडतच; प्रियंका गांधींचा भाजपवर निशाणा

कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य संपुष्टात आले असून कुमारस्वामी सरकार बरखास्त झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्याही हातून सत्ता निसटली आहे. दरम्यान, याच राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. प्रत्येक गोष्ट पैशांनी विकत घेता येत नाही, असे प्रियंका म्हणाल्या आहेत. याशिवाय खोटे कधीना कधी उघडे पडतेच, असेही प्रियंका म्हणाल्या. प्रियंका यांनी ट्विटरमार्फत भाजपवर टीका केली आहे.

नेमके काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

प्रियंका गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपला एका दिवशी जाणीव होईलच की, सगळ्याच गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाही. प्रत्येकाला धमकी देऊन चालणार नाही. खोटं कधीना कधी उघडं पडतच.’

कर्नाटकमधील राजकीय नाट्याला पूर्णविराम

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस पक्षाच्या १६ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे कर्नाटकात अचानक राजकीय भूकंप आल्याचे बोलले जात होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आपली मनधरणी होऊ नये म्हणून १३ बंडखोर आमदार मुंबईत आले. त्यानंतर दररोज सुरु असलेल्या घडामोडींनंतर अखेर मंगळवारी या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा अविश्वासाचा ठराव संमत न झाल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीका केली.


हेही वाचा – सोनभद्र हत्याकांडावरून राजकारण तापले; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

First Published on: July 24, 2019 3:44 PM
Exit mobile version