ऑस्ट्रेलियात तिरंगा घेऊन उभ्या असलेल्या भारतीयांवर खलिस्तान समर्थकांचा हल्ला, पाच जखमी

ऑस्ट्रेलियात तिरंगा घेऊन उभ्या असलेल्या भारतीयांवर खलिस्तान समर्थकांचा हल्ला, पाच जखमी

ऑस्ट्रेलियातील काही खलिस्तानी समर्थकांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन भारतीयांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत ऑस्ट्रेलिया टुडेने ट्विटरद्वारे माहिती दिली असून, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थकांनी मेलबर्नच्या फेडरेशन स्क्वेअरमध्ये हल्ला केला. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी तिरंगा घेऊन उभे असून, खलिस्तानी समर्थक हातात खलिस्तानचे झेंडे घेऊन अचानक तेथे येतात. त्यानंतर तिरंगा हातात असलेल्या विद्यार्थ्यांचा आणि काही लोकांचा पाठलाग करतात आणि त्यांच्यावर हल्ला करत असल्याचे दिसते.

या हल्ल्याच्या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. “ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी समर्थकांच्या भारतविरोधी कारवायांचा मी तीव्र निषेध करतो. या कृत्यांमुळे देशाची शांतता आणि सद्भावना बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करून दोषींवर कारवाई करण्यात यावी”, अशा शब्दांत भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले.

हिंदू ह्युमन राइट्स ऑस्ट्रेलियाच्या संचालक सारा एल गेट्स यांनी ट्विटरवर भारतीय राष्ट्रध्वज घेऊन जाणाऱ्या एका भारतीय तरुणाचा खलिस्तान समर्थकांच्या गटाने पाठलाग केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. गेट्स यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

ऑस्ट्रेलिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातील भारतीयांनी व्हिक्टोरिया पोलिसांना कळवले होते की त्यांनी देशातील वाढत्या खलिस्तान समर्थकांच्या हल्ल्याच्या विरोधात मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअरवर निदर्शने केली होती. दरम्यान, भारतीयांवर तलवार घेऊन येणाऱ्या खलिस्तान्याला फेडरेशन स्क्वेअरवर पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन हिंदू मीडियाने दिले आहे.

ऑस्ट्रेलियन हिंदू मीडियाने ट्विट केले, हाती तलवार असलेल्या खलिस्तानांनी तिरंगा हातात धरलेल्या भारतीयांवर हल्ला केला. मेलबर्नच्या फेडरेशन स्क्वेअरमध्ये आज पोलिसांनी एका खलिस्तानीला अटक केली. या हल्ल्याचा निषेध करताना व्हिक्टोरिया पोलिसांनी सांगितले की, हिंसक हल्ल्यानंतर आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांचे वय ३० आहे आणि त्यांना दंगलखोर वर्तनासाठी दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.


हेही वाचा – विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतदान, नाशिक पदवीधर, कोकण शिक्षकमध्ये चुरशीची लढत

First Published on: January 30, 2023 8:29 AM
Exit mobile version