‘बोफर्सपेक्षा राफेल घोटाळा मोठा’

‘बोफर्सपेक्षा राफेल घोटाळा मोठा’

राफेल विमान ( फोटो सौजन्य - The Morung Express )

राफेल विमानांच्या खरेदीवरून भाजपला आता घरचा आहेर मिळाला. वाजपेयी सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेल्या अरूण शौरी यांनी राफेल करारावरून थेट भाजपला लक्ष्य केले आहे. राफेलमधील भ्रष्टाचार हा बोफर्स घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचा आरोप अरूण शौरी यांनी केला आहे. अरूण शौरी हे ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत. राफेल करारावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केलेले असताना आता अरूण शौरी यांनी भाजपला घरचाच आहेर दिला आहे असेच म्हणावे लागेल. स्वराज्य अभियानाचे नेते प्रशांत भूषण यांनी देखील राफेलचा घोटाळा हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात १९८६ साली झालेल्या बोफर्स घोटाळ्यापेक्षाही राफेलचा घोटाळा मोठा असल्याचे अरूण शौरी यांनी म्हटले आहे. बोफर्स घोटाळ्याचे आरोप झाल्याने काँग्रेस अर्थात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना १९८९ साली सत्ता देखील गमवावी लागली होती. राफेल घोटाळ्याच्या आरोपामुळे भाजपसमोरच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ झाली आहे. फ्रान्सकडून राफेल विमानांची खरेदी किती कोटींना झाली? असा सवाल करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर गोपनियतेचा मुद्दा पुढे करत सरकारने रक्कमेबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला असताना अरूण शौरी यांच्या आरोपाने विरोधकांना आणखी बळ मिळाले आहे.

वाचा – बहुचर्चित राफेल विमान खरेदीचा करार का महत्त्वाचा?

राहुल गांधींचा हल्लाबोल

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती. राफेल करारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. शिवाय, संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांना देखील लक्ष्य करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यावरून निर्मला सीतारामण यांनी राहुल गांधी यांना देखील आपल्या आक्रमक शैलीमध्ये उत्तर दिले होते.

राफेलची भारतामध्ये बांधणी

भारत फ्रान्सकडून ३६ राफेल विमानांची खरेदी करणार आहेत. त्यातील काही विमानांची बांधणी ही भारतामध्ये केली जाणार आहे. डिसॉल्ट या कंपनीशी त्याप्रकारे करार देखील करण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी देखील यामध्ये सहभागी होणार आहे. त्यावरून देखील विरोधकांनी सरकारला लक्ष्य करत रिलायन्सला झुकते माप दिल्याचा आरोप केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांनी थेट भाजपला लक्ष्य करत विमान खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप सरकारवर केला आहे.

वाचा – राफेल व्यवहाराबाबत राहुल गांधींचे रिट्विट

First Published on: August 9, 2018 11:41 AM
Exit mobile version