काँग्रेसची धुरा पुन्हा एकदा राहुल गांधींकडे

काँग्रेसची धुरा पुन्हा एकदा राहुल गांधींकडे

कॉंग्रेस नेते राहुल गांधी

काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी आपल्याकडे घ्यावे, असा सूर बहुसंख्य नेत्यांचा असल्याचे शनिवारी पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट झाले. या बैठकीत उपस्थित बहुतांश पदाधिकार्‍यांनी राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्याची मागणी केली. पक्षातील 99.9 टक्के नेते आणि कार्यकर्त्यांची त्यांच्या नावाला पसंती असल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही पत्रकार परिषदेत केला आहे. पक्षनेतृत्वाची निवड करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी विद्यमान पक्षाध्यक्ष सोनिया गांधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी 10 दिवस चर्चा करणार असून आज (शनिवार) पासून त्यांची सुरुवात होत असल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले. पक्षाची पडझड रोखण्यासाठी संघटनेत अमूलाग्र बदल करावे आणि पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व असावे, अशी मागणी करणार्‍या पक्षातील असंतुष्ट नेत्यांचीही सोनिया गांधी भेट घेणार आहेत.

राहुल गांधी यांनी सन 2017 मध्ये पक्षाच्या नेतृत्वाची धुरा सोनिया गांधी यांच्याकडून आपल्या खांद्यावर घेतली. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांना आपल्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांनी करूनही राहुल गांधी यांनी त्याला दाद दिली नाही. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्षाचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्यास मान्यता दिली.

राजीनामा देताना गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करावे अशी राहुल गांधी यांची भूमिका होती. ती अद्यापही कायम असल्याचा दावा पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला आहे. मात्र, राहुल गांधी हेच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे नैसर्गिक दावेदार असून गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष निवडण्याची वेळ आल्यास पक्षात मतभेद होऊन पक्षात फूट पडण्याची शक्यताही अनेक नेते व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरजेवाला यांनी केलेल्या दाव्याला महत्व आले आहे.

First Published on: December 20, 2020 7:16 AM
Exit mobile version