मोदी सरकारची चार वर्षे ‘घमासान’

मोदी सरकारची चार वर्षे ‘घमासान’

संग्रहित छायाचित्र

यंदाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली. या चार वर्षातील भाजपच्या आणि मोदींच्या एकंदर कार्यावर सध्या सर्व स्तरातून भाष्य केले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही याबाबात आपापली मते व्यक्त केली आहेत. वाचा काय म्हणाले हे दोन महारथी…

राहुल गांधींनी मोदी सरकारला दिलं ‘एफ’ ग्रेड

केंद्रातील सत्तेला 4 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी सरकारने आपले रिपोर्ट कार्ड सादर केले. मोदी सरकारच्या या रिपोर्ट कार्डवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना ‘एफ’ ग्रेड देत निशाणा साधला आहे. 4 वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकार असंख्य कार्य, मोर्चेबांधणीमध्ये अपयशी ठरल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला ग्रेड्सदेखील दिले आहेत. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर ‘फेल’ ठरल्याचे सांगत, राहुल गांधींनी त्यांना ‘एफ’ ग्रेड दिले आहे.

काँग्रेस अध्यक्ष – राहुल गांधी

राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जारी केलेले मोदी सरकारवरील स्वत:चे रिपोर्ट कार्डमध्ये कृषी, परराष्ट्र धोरण, इंधनाचे दर आणि रोजगार निर्मितीमध्ये मोदी सरकारला ‘एफ’ म्हणजेच ‘फेल’ ग्रेड दिले आहे. मात्र, घोषणाबाजी आणि जाहिरातबाजीमध्ये हे सरकार आघाडीवर असल्याचा टोला हाणत ‘एप्लस’ ग्रेड राहुल गांधी यांनी दिला आहे. महत्त्वाच्या मुद्यांवर मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असले तरी लोकांना आकर्षित करण्यात मात्र अव्वल ठरल्याचे टिकास्त्रही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सोडले आहे.

अमित शहा यांनी मोदींच्या कामकाजावर उधळली स्तुतीसुमने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील राजकारणात खूप मोठा बदल झाला आहे. मोदी सरकारने घराणेशाही आणि जातीयवादाचे राजकारण संपवले असून, देशाच्या विकासावर जास्त भर दिला आहे, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शहा म्हणाले, देशाला भाजपने खऱ्या अर्थाने सर्वात जास्त कष्ट करणारे पंतप्रधान दिले आहेत. गरिबी व भ्रष्टाचार देशातून दूर करण्यासाठी धोरण राबवित आहेत. तसेच देशातील प्रत्येक गावात वीज पोहचली आहे. एक कोटी लोकांना स्वतःचे घर दिले असून 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला घर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरिबांना गॅस सिलिंडर दिले.

भाजप अध्यक्ष – अमित शहा

मोदींच्या आवाहनावर दीड कोटी लोकांनी गॅसवर मिळणारे अनुदान सोडले. पॅलेस्टिन, अफगाणिस्तान आणि सौदी अरबच्या सर्वोच्च सन्मानाने मोदींचा गौरव झाला आहे. त्यांनी हा 125 कोटी जनतेचा सन्मान असल्याचे म्हटले आहे. देशात सध्या पुन्हा-पुन्हा खोटे बोलण्याचे राजकारण सुरू आहे. विरोधकांना मोदी नको आहेत. मोदींना हटवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र झाले आहेत. लोकशाहीला पायदळी तुडवणारे आज म्हणत आहेत की, देशात भीतीचे वातावरण आहे, अशी टीका शहा यांनी काँग्रेसवर केली. 2019च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, असे शहा म्हणाले.

 

 

 

First Published on: May 28, 2018 7:37 AM
Exit mobile version