राहुल गांधीची ईडीच्या चौकशीतून एक दिवस सुट्टी, शुक्रवारी पुन्हा होणार चौकशी

राहुल गांधीची ईडीच्या चौकशीतून एक दिवस सुट्टी, शुक्रवारी पुन्हा होणार चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald case) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मागील तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. मात्र, आज दिवसभर करण्यात आलेल्या चौकशीनंतर राहुल गांधींना उद्या(गुरूवार) सुट्टी देण्यात आली आहे. तर ईडीने शुक्रवारी पुन्हा एकदा राहुल गांधींना समन्स बजावले आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची मागील तीन दिवसांपासून ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे. आज सकाळपासून राहुल गांधींची चौकशी सुरू आहे. मात्र, रात्री उशीरा ८.३० वाजेच्या सुमारास त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सलग तीन दिवस चौकशीनंतर राहुल गांधी यांनी उद्या एक दिवसासाठी चौकशीला येता येणार नाही, त्यासाठी मुभा द्यावी, अशी विनंती ईडीकडे केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची विनंती ईडीने मान्य केली असून शुक्रवारी त्यांना पुन्हा एकदा चौकशीला हजर रहावे लागणार आहे.

राहुल गांधींच्या ईडी चौकशीचा निषेधार्थ ठिकठिकाणी काँग्रेसनं निदर्शनं केली. ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात गांधी भवनपासून ते रिगल जंक्शनपर्यंत काँग्रेसच्या आंदोलनाची सुरूवात झाली. या आंदोलनात अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलनं केलं. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसकडून राज्यातील काही भागात आंदोलनं करण्यात आली. गांधी कुटुंबावर खोट्या पद्धतीचं लांच्छन लावून बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

दिल्लीसह देशातील इतर राज्यांमध्ये काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत काँग्रेसच्या ८०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत काँग्रेसने दिल्ली पोलिसांवर आरोपही केले आहेत.


हेही वाचा : देशातील सर्व राजभवनांना उद्या घेराव घालणार, काँग्रेस नेते आक्रमक


 

First Published on: June 15, 2022 10:08 PM
Exit mobile version